नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
नेवासा पोलिसांनी (Newasa Police) देवगाव शिवारामध्ये एका डंपरमधून होत असलेल्या अवैध वाळु वाहतुकीवर कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.31 रोजी परिवक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांना देवगाव शिवारामध्ये एका डंपरमधून वाळू वाहतूक (Sand Transport) होणार आहे, अशी माहीती मिळाल्याने तात्काळ पोसई शैलेंद्र ससाणे, पोलीस नाईक बी.बी. काळोखे, बाबासाहेब वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक वाघ, संदीप ढाकणे, गणेश फाटक आदींचे पथक तयार करुन, त्यांना सदर ठिकाणी जावून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.
त्यानुसार पथकाने कुकाणा (Kukana) ते देवगाव मार्गावर सापळा लावला. काही वेळाने देवगावकडून एक वाळूने भरलेला डंपर येताना दिसल्याने त्यास पोसई शैलेंद्र ससाणे यांनी हात दाखवून थांबण्याचा ईशारा केला असता, सदर डंपरच्या चालकाने त्याचा डंपर न थांबवता पुढे घेवून गेला. त्या दरम्यान पोलीस पथकाने त्यांच्याकडील वाहनाने डंपरचा पाठलाग करुन काही अंतरावर डंपर पकडुन त्यास थांबवले, त्यावरील चालकास नाव विचारले असता, त्याने सोमनाथ लक्ष्मण पवार (वय 36, रा.खडका) असे सांगितले. त्यास वाळू कोठुन आणली याबाबत विचारणा केली असता, त्याने सदरची वाळू ही गोदावरी नदीच्या पात्रातून आणली असल्याबाबत सांगून त्याबाबत त्याच्याकडे कसलाच परवाना नसल्याचे सांगितले.
पोलिसांनी सदर ठिकाणाहून MH 16- A 0961 या क्रमांकाचा डंपर त्यामधील अंदाजे 03 ब्रास वाळू असा एकूण 15 लाख 45 हजार रुपयांच्या मुद्देमालासह हस्तगत केला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक जालींदर वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक बी.बी. काळोखे हे पुढील तपास करत आहेत.