Saturday, September 21, 2024
Homeनगरनेवासा विधानसभेसाठी भाजप नवीन चेहर्‍याच्या शोधात!

नेवासा विधानसभेसाठी भाजप नवीन चेहर्‍याच्या शोधात!

भाजपा अंतर्गत गटबाजीमुळे शिंदे गट शिवसेनेचा मतदारसंघावर दावा

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदारसंघात अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. जोपर्यंत नव्या चेहर्‍यांना संधी दिली जात नाही तोपर्यंत पक्षात कोणतीही ऊर्जा दिसणार नाही म्हूणन भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत नवीन चेहर्‍यांच्या शोधात असून उमेदवारांची अदलाबदल आणि नवीन चेहर्‍यांना संधी देण्याचा विचार करीत असल्याचे भाजपा कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जनतेचा कल हा विद्यमान नेत्यांबाबत नाराजीचा दिसून आला. पक्ष पातळीवर त्याची दखल न घेतल्याने राज्यात सत्ता असूनही पराभव झाला. नेवासा विधानसभेचा विचार केला तर संमिश्र परिस्थिती दिसून येते.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तालुक्यातील सत्तास्थाने ताब्यात, गावोगावी मजबूत संघटना आणि त्यांनी घोंगडी बैठकांतून तालुका पिंजून काढला आहे. गडाख यांच्या नेतृत्वामुळे आघाडीची बाजू भक्कम दिसत आहे. पण विरोधात असणार्‍या भाजपमध्ये मात्र उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. 2014 विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांचा पराभव झाला. 5 वर्षात सत्तेच्या काळात भाजप नेतृत्वाने संघटनेकडे दुर्लक्ष केले. नवीन नेतृत्व निर्माण न होऊ देणे असे प्रकार झाले. यामुळे पक्ष बांधणी मजबूत होण्याऐवजी विस्कळीत झाली आणि 2019 ला दारुण पराभव झाला.

पराभवानंतर देखील कार्यकर्त्यांशी नेत्यांनी संवाद ठेवला नाही. अनेकवेळा तक्रारी करूनही दखल घेतली गेली नाही. परिणामी अनेकांनी काम थांबून घेतले तर अनेकांनी आमदार गडाख गटात प्रवेश केला. मध्यंतरी राज्यात आघाडी सरकार जाऊन महायुतीचे सरकार आले. उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्षपद नेवासा तालुक्यातील विठ्ठलराव लंघे यांना मिळाले. मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन संघटनेची विस्कटलेली घडी मूळ पदावर आणून मजबूत करणे अपेक्षित होते. परंतु तालुका कार्यकारिणी व पदाधिकारी निवड करताना प्रमुख कार्यकर्ते यांना विचारात न घेणे, सक्रिय कार्यकर्ते यांना पाठबळ न देणे, एकमेकांशी साटे-लोटे करून नविन नेतृत्व निर्माण होऊ न देणे, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याची संवाद न राहिल्यामुळे कार्यकर्ते गटा-गटात विभागले गेल्यामुळे नाराजीचा सूर सोशल मीडियावर निघत असून नवीन चेहर्‍याला संधी दिली जावी असे ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते यांची मागणी जोर धरत आहे.

जुना-नवा वाद नेहमीच बघायला मिळतो. त्यामुळे मूळ भाजप विचारधारा असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपकडून उमेदवारीसाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाअध्यक्ष विठ्ठलराव लंघे, उप जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, ऋषिकेश शेटे स्पर्धेत आहेत. नेवासा तालुक्यातील भौगोलिक मांडणीचा विचार केला असता, आजवर झालेले आमदार हे कुकाणा, सोनई भागातील आहेत. आजपर्यंत प्रवरा नदीकाठ असणार्‍या नेवासा शहरास जोडणार्‍या 28 गाव परिसराला प्रतिनिधित्व मिळालेले नाही. 2009 साली नेवासा शेवगाव मतदारसंघ वेगळे होऊन नेवासा स्वतंत्र मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला.

2009 पासून तर 2024 पर्यत झालेल्या लोकसभा व विधानसभा निकालाचा आढावा घेतला तर निवडणुकीत या भागाचा प्रभाव असल्याचे दिसून आले आहे. एकूण मतदारापैकी 72 हजार मतदार या भागातील असून हा परिसर प्रस्थापितांच्या कायम विरोधी असल्याचे दिसून आले आहे. या परिसरातून पक्षाने संधी द्यावी अशी येथील लोकांची व कार्यकर्ते यांची मागणी आहे. भाजपाच्या गटबाजीचा अंदाज आल्याने लोकसभेला नेवासा तालुक्यातीत मिळालेल्या मताधिक्यामुळे शिवसेना शिंदे गटाने मतदारसंघावर दावा केला असून हा मतदारसंघ भाजपा की शिंदे गटाला व उमेदवारी कुणाला असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या