कुकाणा व नेवासा खुर्दच्या जागा रिक्त; पशुपालकांची अडचण
नेवासा (तालुका प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यासाठी मंजूर असलेल्या पशुधन विकास अधिकार्यांच्या 6 जागांपैकी 2 जागा रिक्त असून तालुक्याला दोन पशुधन विकास अधिकार्यांची गरज आहे. नेवासा तालुक्यात नेवासा खुर्द, कुकाणा, शिरसगाव, सलाबतपूर, वडाळा व सोनई असे एकूण 6 श्रेणी-1 मधील पशुवैद्यकीय उपचार केंद्रे (दवाखाने) आहेत. या 6 दवाखान्यांसाठी अधिकार्यांची 6 पदे मंजूर आहेत. व्यतिरिक्त तालुक्यात करजगाव, चांदा, माका, प्रवरासंगम, बेलपिंपळगाव, वरखेड, घोडेगाव, भानसहिवरे येथे श्रेणी-2 मधील पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.
कुकाणा येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. मनोज शिंदे यांची दि. 27 ऑगस्ट 2019 रोजी शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथे बदली झाल्याने हे पद 6 महिन्यांपासून रिक्त आहे. शिरसगाव येथील पशुधन विकास अधिकार्यांकडे कुकाणा येथील पदभार सोपविण्यात आलेला आहे. कुकाणा केंद्राचे अंतर्गत कुकाणा विभागातील 16 आणि माका विभागातील 5 अशा एकूण 21 गावांचे कार्यक्षेत्र असून सुमारे 35 ते 40 हजार पशुधन आहे. त्यामुळे कुकाणा पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी पूर्ण वेळ पशुधन विकास अधिकार्याची गरज आहे.
नेवासा खुर्द येथील श्रेणी-1 पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकरी ही जागा रिक्त आहे. येथील पशुधन विकास अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सलाबतपूर केंद्राचे पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. परंतु सलाबतपूर व शिरसगाव येथील दोन्ही पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-1 मधील असल्याने आणि पशुधनही अधिक असल्याने पदभार असलेल्या डॉक्टरांना कुकाणा व नेवासा खुर्द येथील दवाखान्यांसाठी पूर्ण वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे पशुपालकांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे तातडीने स्वतंत्र पशूधन अधिकारी नेमावेत, अशी मागणी होत आहे.