Tuesday, September 24, 2024
Homeक्राईमभाचीच्या आत्महत्येमुळे मामाचा राग; सुपारी देऊन काढला काटा

भाचीच्या आत्महत्येमुळे मामाचा राग; सुपारी देऊन काढला काटा

नेवासा येथील शंतनु वाघ यांच्या खुनाचा प्रयत्न करणारे तिघे गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

भाचीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या व्देषातून मामाने भाचे जावयाचा काटा काढण्यासाठी सराईत गुन्हेगारांना सुपारी दिल्याची धक्कादायक बाब स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शिवनाथ ज्ञानदेव चावरे (वय 41 रा. जळके खुर्द, ता. नेवासा), ज्ञानदेव उर्फ नारायण सूर्यभान लष्करे (वय 42 रा. पावन गणपती मंदीरासमोर, नेवासा), संदीप साहेबराव धनवडे (वय 39 रा. भेंडा खुर्द, ता. नेवासा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

शिवनाथ चावरे याच्या भाचीचा विवाह शंतनु पोपट वाघ (रा. नेवासा) यांच्यासोबत झाला होता. दरम्यान, मागील एक वर्षापूर्वी भाचीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या व्देषातून भाचे जावई शंतनु वाघ यांचा काटा काढण्यासाठी मामे सासरे शिवनाथ चावरे याने सराईत गुन्हेगार ज्ञानदेव उर्फ नारायण सूर्यभान लष्करे, संदीप साहेबराव धनवडे व त्यांच्या इतर साथीदारांना सुपारी दिली होती. त्यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 09.30 वाजेच्या सुमारास शंतनू वाघ हे घरून दुचाकीवर खडका फाटा येथील त्यांच्या खडीक्रेशकडे जात असताना त्यांचा पाठलाग केेला. रस्त्यात बोलेरो वाहनाची शंतनुच्या दुचाकीला धडक देऊन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रृती सौरभ पोखरकर (रा. बालेवाडी स्टेडीयम जवळ, म्हाळुंगे, पुणे) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अतुल लोटके, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, संदीप दरंदले, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, बाळासाहेब गुंजाळ, अरूण मोरे यांच्या पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन तसेच वाघ यांच्या घरापासून ते घटना ठिकाणापर्यंतचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केले असता त्यामध्ये वाघ यांच्या दुचाकीचा एका पांढर्‍या रंगाच्या बोलेरो वाहनाने पाठलाग केल्याचे दिसून आले.

सदर बोलेरो वाहनावरून शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून शिवनाथ चावरे, ज्ञानदेव उर्फ नारायण लष्करे व संदीप धनवडे यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ज्ञानदेव उर्फ नारायण लष्करे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द खुनाचा प्रयत्न, दंगा करणे असे एकूण चार व संदीप धनवडे याच्याविरूध्द जबरी चोरी, दंगा करणे असे दोन गुन्हे दाखल आहेत.

एसपींनी घेतली दखल
घटना घडल्यानंतर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयितांना नेवासा पोलिसांकडून अटक केली जात नव्हती. त्यांच्या अटकेसाठी नेवासा येथील नागरिक व वाघ कुटुंबाने पोलिसांना निवेदन दिले होते. तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली होती. अधीक्षक ओला यांनी गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न नसल्याने व सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून तिघांना अटक केली आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक धाकराव करीत असून आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या