नेवासा । प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत असलेल्या नेवासा नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून, येथे कमालीची चुरस पाहायला मिळाली. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने १७ पैकी १० जागा जिंकून नगरपंचायतीमध्ये स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.
मात्र, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गडाख यांना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार डॉ. करणसिंह घुले यांनी नगराध्यक्ष पदाच्या लढतीत विजय मिळवत गडाखांच्या गडावर भगवा फडकवला आहे. गडाख यांनी या निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेपासून दूर जात स्वबळावर आपला क्रांतिकारी शेतकरी पक्ष मैदानात उतरवला होता.
नगरसेवक पदाच्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले असले तरी, थेट जनतेतून निवडून द्यायच्या नगराध्यक्ष पदासाठी मतदारांनी महायुतीच्या डॉ. करणसिंह घुले यांना पसंती दिली. महायुतीने नगरसेवक पदाच्या ६ जागा जिंकल्या असून एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. एकूण ७८.०६ टक्के मतदान झालेल्या या निवडणुकीत नेवासेकरांनी नगरसेवक म्हणून गडाखांना, तर शहराचा कारभारी म्हणून महायुतीला कौल दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे नेवासा नगरपंचायतीत आता गडाखांचे नगरसेवक आणि महायुतीचा नगराध्यक्ष असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.




