Thursday, May 23, 2024
Homeनगरनेवासाफाटा येथे हॉटेल मालकास दांड्याने मारहाण

नेवासाफाटा येथे हॉटेल मालकास दांड्याने मारहाण

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासाफाटा येथील हॉटेल व्यावसायिकास ही जागा आमची असून खाली करा असे म्हणून लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच मारहाण करताना हॉटेलमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला त्यांचा धक्का लागून मूर्ती खाली पडून विटंबना झाल्याची घटना घडली. याबाबत हॉटेल मालकाच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत हॉटेलमालक सुरेंद्रसिंग कैलास परदेशी (वय 30) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, नेवासा फाटा ते नेवासा जाणारे रोडवर माझे ‘प्रिन्स’ नावाचे हॉटेल असून ते मी स्वतः चालवतो.

9 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मी माझ्या हॉटेल मधे असताना गणेश माटे रा. मुकिंदपूर (नेवासा फाटा) व श्री. पठाण मिस्तरी (पूर्ण नाव माहीत नाही) यांचेसह इतर तीन अनोळखी व्यक्ती हे माझ्या हॉटेलमध्ये आले व मला ही जागा आमची असून तू जागा खाली कर असे म्हणून मला शिवीगाळ केली. गणेश माटे याने लाकडी दांड्याने माझ्या पाठीत मारहाण करून तेथे पडलेला लोखंडी रॉड हातात घेऊन शिवीगाळ केली तसेच पठाण मिस्तरी व इतर तीन अनोळखी इसमांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून माझ्या हॉटेल शेजारील माळ्याला कुलूप लावून निघून गेले.

सदर भांडणात माझ्या हॉटेलच्या काउंटरवर ठेवलेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीला गणेश माटे व पठाण मिस्तरी याचा धक्का लागून शिवाजी महाराजांची मूर्ती खाली पडून मूर्तीची विटंबना झाली. त्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या आहेत. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 295, 324, 323, 143, 147, 148, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या