नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
तालुक्यातील नेवासा फाटा परिसरातील नामदेवनगर येथे हातात धारदार पात्याची तलवार घेऊन उभा असलेल्या एका तरुणास गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संदीप संजय दरंदले यांनी नेवासा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मंगळवारी 11 जून रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशाने मी, हवालदार दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे, पोलीस नाईक ज्ञानेश्वर नामदेव शिंदे, कॉन्स्टेबल किशोर आबासाहेब शिरसाठ नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा असे खासगी वाहनाने नेवासा पोलीस ठाणे हद्दीत अवैध शस्त्र बाळगणार्या इसमांची माहिती घेत असताना एक इसम नेवासा ते नेवासा फाटा रोडवरील हॉटेल कृष्णाच्या समोरील नामदेवनगर पाटी असलेल्या ठिकाणी तलवार घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली.
नेवासा पोलीस ठाण्याचे हवालदार संतोष राठोड यांना माहिती दिली. त्यांनी दोन पंच सोबत दिले. पोलीस स्टाफ व दोन पंच असे खासगी वाहनाने दुपारी 4 वाजता सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक इसम तलवार घेऊन उभा असल्याचे दिसले. त्याचे नाव गाव विचारले असता त्याने शेखर दादासाहेब आहिरे (वय 31) रा.नेवासा फाटा, ता. नेवासा असे असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून 10 हजार रुपये किंमतीची तीक्ष्ण धारदार पात्याची एक लोखंडी तलवार जप्त केली. 4.5 से.मी इंच रूंदीचे पाते असलेली एक बाजूस धार व दुसरे बाजूस खाचे असलेली टोकास निमुळत्या आकाराची तीस 17 सेमी गोलाकार पितळी मूठ असलेली व 74 सेंटीमीटर लांबीची तलवार हवालदार संतोष राठोड यांनी दोन पंचांसमक्ष जागीच जप्त केली.या फिर्यादीवरून शेखर दादासाहेब आहिरे याचेवर भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.