Friday, April 25, 2025
Homeक्राईमनेवासा रोडवर टारगट तरुणांचा नंगानाच

नेवासा रोडवर टारगट तरुणांचा नंगानाच

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जिल्ह्यात एकेकाळी शांततेचे शहर म्हणून ख्याती असलेले श्रीरामपूर या-ना त्या कारणाने सतत चर्चेचा विषय बनत आहे. येथील तरुणांमध्ये गुन्हेगारी जगताचे आकर्षण वाढताना दिसत आहे. काल सायंकाळच्या सुमारास असाच प्रकार नेवासा रोडवर घडला. मोठ्या कारमध्ये येवून काही तरुणांनी भररस्त्यावर एकास जबर मारहाण केली. नंगानाच घालत आरडाओरडा करत परिसरातील अनेक व्यावसायिकांचे नुकसानही केले. या प्रकारामुळे त्या परिसरात काहीकाळ दंगलसदृश परीस्थिती निर्माण झाली होती.

- Advertisement -

नेवासा रोडवरील कॉलेजकडे जाणार्‍या अंडरग्राऊंड पुलाजवळ काल सायंकाळी अचानक काही तरुण एका कारमधून दाखल झाले. मागील वादाच्या कारणातून एकास जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पळापळ सुरु झाली त्या तरुणांनी सोबत आणलेली कार रस्त्यालगतच्या दुकानदारांच्या वस्तूवर धडकवली. त्यामुळे अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले. त्यात या कारचे एक चाक पंक्चर झाले. त्याही अवस्थेत कारमधील तरुणांनी ती कार जमावाच्या दिशेने चालविली त्यात अनेकांच्या वाहनांचेही नुकसान झाले. या तरुणांच्या नंगानाचामुळे काही काळ त्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस येताच या तरुणांनी तेथून पळ काढला. परंतु रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात याबाबत काहीच नोंद नव्हती. ही घटना कोणत्या कारणाने घडली याची पोलिसांची चौकशी सुरू आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पेन्शनरांचे शहर म्हणून श्रीरामपूर शहराची ओळख आहे. सेवानिवृत्त झाले की, अनेकांनी राहीलेले जीवन शांततामय घालविण्यासाठी श्रीरामपूरला पसंती दिली होती. परंतु काही दिवसांपासून येथील शांततेला कुणाचीतरी नजर लागली. शहरात बेसुमार अवैध धंदे फोफावले, गोदावरी व प्रवरा या नद्यांचा भाग लाभलेला असल्याने बेसुमार वाळूउपसा होवून तरुणांच्या हाती मोठी माया जमा झाली. त्यातून अधून-मधून टोळी युध्दांचा भडका उडत आहे. त्यामुळे येथील शांतता भंग पावत आहे. येथील नागरिक स्वत:ला असुरक्षित समजू लागला आहे. या बिघडलेल्या परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...