Sunday, October 6, 2024
Homeनगरनेवाशातील पैस खांबाची वर्षभरातून एकदा यात्रा भरवावी

नेवाशातील पैस खांबाची वर्षभरातून एकदा यात्रा भरवावी

संत-महंतांची मागणी || ज्ञानेश्वर सृष्टी आराखड्याबाबत विविध सूचना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नेवाशाच्या संत ज्ञानेश्वर सृष्टी आराखडा कामाच्या आढावा बैठकीत उपस्थित संत-महंतांनी वर्षभरातून एकदा पैस खांबाची यात्रा व्हावी, अशी मागणी केली. तसेच नेवाशातील ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता प्रशस्त असावा. श्रीरामपूरकडून येताना नदी काठावर पुल बांधण्यात यावा. नेवासा शहराबाहेरून बायपास रस्ता व्हावा, ज्ञानेश्वरीचे पारायण करणारे अभ्यासक यांची निवास व जेवणाची सोय व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

- Advertisement -

कोट्यवधी रुपये खर्चून नेवाशातील पैस खांब मंदिर व ज्ञानेश्वर मंदिर परिसर विकसित होत आहे. यासाठी संत ज्ञानेश्वर सृष्टी आराखडाही तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात कोणत्या सुविधा हव्यात, याची माहिती घेण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी सहकार सभागृहात संत-महंत व महाराज यांची बैठक घेतली. यावेळी सुरुवातीला उपस्थित महाराजांनी विविध सूचना केल्या. बैठकीला पालकमंत्री विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, रामराव महाराज ढोक, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, देवीदास महाराज म्हस्के, उद्धव महाराज मंडलिक, माजी आमदार पांडुरंग अभंग आदी उपस्थित होते.

यात अर्जुन महाराज तनपुरे (राहुरी), बाबासाहेब वाळुंज (राहुरी), दीपक महाराज देशमुख (अकोले), नंदकिशोर खरात महाराज, औंदनाथ गिरी महाराज यांच्यासह राजेंद्र महाराज नवले (अकोले), गुंजाळ महाराज, मनसुख महाराज (कोपरगाव), गोविंद महाराज (पाथर्डी), अनिल महाराज वाळके, नवनाथ महाराज म्हस्के (राहाता), भागवत महाराज जंगले (नगर) शुभम महाराज (श्रीरामपूर) आदींनी विविध सूचना केल्या. नगर जिल्ह्यात ज्ञानाचा जन्म झाला असल्याने असे ठिकाण आगळे वेगळे देवस्थान निर्माण व्हावे, वारकरी, साधू, संत यांचे दर तीन महिन्यातून संमेलन व्हावे, मंदिर व परिसरातील 5 ते 210 किलोमीटर भागातील मांसाहार बंद व्हावा, शासकीय गुरुकूल निर्मिती करावी, संतपीठ निर्माण करावे, महाराष्ट्रातील अन्य देवस्थानांचा एकमेकांशी सुसंवाद व त्यांचे एकत्रीकरण व्हावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

ज्ञानेश्वर सृष्टीचा आराखडा तयार करणारे विकसक शिल्प अभ्यासक अजय कुलकर्णी यांनी सादरीकरण सादर केले. या ठिकाणी हेमांडपंथी शैलीत मंदिर शिल्प, पसायदानावर आधारीत शिल्प उभे करणार आहोत. 3500 लोकांना एकाच वेळी पारायण करता येईल, असे सभागृह, वास्तू, कुंभ निर्माण करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर यांचा जन्म ते संजीवन समाधीपर्यंत प्रवास मांडण्याचा प्रयत्न शिल्पसृष्टीतून करण्यात आला असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. 1300 व्या शतकाप्रमाणे मंदिर उभे करण्याचा प्रयत्न असून, मोगरा नावाचे उद्यान उभे करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर-नेवासा कॉरिडॉर
संपूर्ण जगाला जीवनाचे तत्वज्ञान ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार्‍या संत ज्ञानेश्वर महाराजांचा जीवनपट उलगडवणारा जागतिक दर्जाचा संत ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्प नेवासे येथे उभारण्यात येणार आहे. या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. भगवतगितेचा भावार्थ संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगासमोर आणला. जगाला जीवनाचे तत्वज्ञान देणार्‍या या ग्रंथाचे 21 भाषेत भाषांतर करण्यात आले. देशातील असा हा एकमेव ग्रंथ असून या ग्रंथाच्या निर्मितीबरोबरच जगाला शांततेचा संदेश देणार्‍या पसायदानाची निर्मितीही आपल्या जिल्ह्यातून झाली याचा अभिमान आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी, उज्जैन येथे धार्मिक कॉरिडॉरची उभारणी केली, त्याच धर्तीवर त्र्यंबकेश्वर व नेवासा येथे कॉरिडॉरची उभारणी करण्याचा मानस असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या