Tuesday, March 25, 2025
Homeनगरउसाचे आगार असलेला नेवासा तालुका बनतोय ‘केळी हब’

उसाचे आगार असलेला नेवासा तालुका बनतोय ‘केळी हब’

नेवासा | सुखदेव फुलारी| Newasa

ऊस पिकाचे आगार म्हणून ओळख असलेला नेवासा तालुक्यातील शेतकरी आता फळबाग लागवडीकडे वळला असून नेवासा तालुका आता ‘केळी हब’ बनला आहे. नेवासा तालुक्यातील शेतीला मुळा, प्रवरा, गोदावरी नदी बरोबरच मुळा, भंडारदरा धरणाच्या कालव्याचे व जायकवाड़ी बॅकवाटरचे पाणी मिळते. त्यामुळे बागायती क्षेत्र मोठे आहे. पाणी उपलब्ध असल्याने व नगदी पीक असल्याने शेतकरी ऊस पिकांवर भर देत असतात.तालुक्यात ज्ञानेश्वर, मुळा व स्वामी समर्थ हे तीन साखर कारखाने आहेत. या कारखान्यांबरोबरच जिल्ह्यातील इतर कारखान्यांनाही नेवासा तालुक्यातून ऊसपुरवठा होतो.
मात्र उसाच्या पिकाला लागणारा कालावधी, मिळणारा दर आणि होणारा उत्पादन खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी आता फळबाग लागवडीकडे वळला आहे.

- Advertisement -

नेवासा तालुक्यामध्ये केळी, आंबा, डाळिंब, संत्री, पेरू या सारखी फळपीके घेतली जात आहेत. तालुक्यात कृषी विभागामार्फत सन 2024-25 मधे महात्मा गांधी रोहयो फळबाग अंतर्गत मार्चअखेर 157 हेक्टर व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 66 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. यापैकी केळीचे क्षेत्र जवळपास 67 हेक्टर आहे. केळी पिकापासून शेतकर्‍यांना जवळपास 3 ते 4 लाखापर्यंत नफा मिळत आहे. नेवासा तालुक्यामध्ये एकूण केळी पिकाचे क्षेत्र 278 हेक्टर पर्यंत पोहोचले आहे.

रोहयो अंतर्गत केळी लागवडीसाठी प्रती हेक्टरी 2 लाख 82 हजार इतके मजुरी व सामुग्रीसाठी अनुदान मिळते. व्यापारी केळी जागेवर येऊन खरेदी करत आहेत. तसेच तालुक्यामध्ये केळी पिकवण्यासाठी रायपनिंग चेंबर ची देखील सुविधा असल्याने केळी पिकाकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. नेवासा तालुक्यात केळी 277 हेक्टर, आंबा 238 हेक्टर, डाळिंब 798 हेक्टर, संत्रा 254 हेक्टर, पेरू 148 हेक्टर फळबाग क्षेत्र आहे.

नेवासा तालुक्यातील मंडलनिहाय केळी लागवड (हेक्टरमध्ये)
नेवासा खुर्द (20), नेवासा बुद्रुक (21), सलाबतपूर (57.80), कुकाणा (85), चांदा (53), सोनई (69), घोडेगाव (33), वडाळा बहीरोबा (20), प्रवरासंगम (22), देडगाव (49), भानसहिवरे (45).

अडीच एकर केळी लागवड
तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे व कृषी सहाय्यक श्री. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी रोहयो फळबाग अंतर्गत 2.5 एकर क्षेत्रावर नवीन केळी लागवड केलेली आहे. मजुरी व सामुग्रीसाठी अनुदानही मला मिळाले आहे.
– संदीप जावळे, केळी उत्पादक शेतकरी, भेंडा

अनुदानाचा परिणाम
महाराष्ट्र ग्रामीण रोहयो फळबाग लागवड अंतर्गत केळी पिकाचा समावेश 2023 मध्ये झाला आहे. केळी फळपिकामधून इतर पिकांच्या तुलनेत उत्पन्न चांगले मिळत असल्याने व लागवडीसाठी अनुदान मिळत असल्याने नेवासा तालुक्यामध्ये केळी लागवड वाढली आहे.
– धनंजय हिरवे, तालुका कृषी अधिकारी, नेवासा

माल कटींगचे प्रमाण वाढले
नेवासा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात माल कटिंग केला जातो. सध्या केळीला प्रतिकिलो 13 ते 14 रुपये दर असून तो पंचवीस रुपयांपर्यंतही जातो.
– पिंटू वाघडकर, केळी व्यापारी, भेंडा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...