Monday, September 28, 2026
Homeक्राईमAhilyanagar : नेवासा तालुक्यातील महिलेचे 20 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास

Ahilyanagar : नेवासा तालुक्यातील महिलेचे 20 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास

पुणे ते अहिल्यानगर एसटी बस प्रवासादरम्यानची घटना || गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पुणे ते अहिल्यानगर एसटी बस प्रवासादरम्यान करजगाव (ता. नेवासा) येथील महिलेच्या बॅगेतील सुमारे 20 तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मिनाबाई ज्ञानदेव बडाख (वय 57) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

फिर्यादी मिनाबाई बडाख या आपल्या मुलीच्या घरी पुणे येथे गेल्या 20 दिवसांपासून वास्तव्यास होत्या. या काळात त्यांनी आपल्या वापरातील सर्व सोन्याचे दागिने सोबत ठेवले होते. मंगळवारी (7 एप्रिल) सकाळी त्या पुणे येथून आपल्या गावी परतण्यासाठी वाकडेवाडी एसटी स्थानकावरून पुणे-पाथर्डी बसमध्ये बसल्या. सुरूवातीला त्यांच्या शेजारी कोणीही नव्हते. मात्र, शिरूर येथे बस थांबल्यानंतर दोन महिला बसमध्ये चढल्या. त्यापैकी एक महिला त्यांच्या शेजारी बसली तर दुसरी बाजूच्या सीटवर बसली. प्रवासादरम्यान मिनाबाई यांना झोप लागली.

काही वेळानंतर जाग आल्यावर शेजारी बसलेली महिला दुसर्‍या सीटवर गेल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर पुन्हा त्यांना झोप लागली. दरम्यान, त्या संशयित महिला सुपा परिसरात बसमधून उतरल्याचा अंदाज आहे. केडगावजवळ बस पोहोचल्यावर मिनाबाई यांनी आपली बॅग तपासली असता, त्यामधील सोन्याचे सर्व दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. दागिने चोरीला केल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तात्काळ कोतवाली पोलिसांत धाव घेतली व रात्री उशिरा फिर्याद दिली.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये अडीच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, प्रत्येकी चार तोळ्यांचे दोन गंठण, दीड तोळ्याचे मिनी गंठण, 11 ग्रॅमचे कानातील झुंबे, एक तोळ्याचे कानातील टॉप, सात ग्रॅमचे टॉप, 15 ग्रॅमचे टॉप, साडेतीन ग्रॅमचे कानातील वेल, 13 ग्रॅमची अंगठी, पाच ग्रॅमच्या सोन्याच्या पाच अंगठ्या, एक तोळ्याची चैन यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे 12 लाख 85 हजार रूपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक कुणाल सपकाळे पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...