अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सोशल मीडियाचा गैरवापर करून नेवासा तालुक्यातील एका युवतीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित युवतीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून, तिचे फोटो आणि गावातील एका तरूणाचे फोटो एकत्र करून ते समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आले. याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
18 वर्षीय पीडित युवतीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. नेवासा तालुक्यातील एका गावात राहणार्या युवतीच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्रामवर बनावट प्रोफाईल तयार केले होते. या खात्यावर पीडितेचे मूळ फोटो वापरून त्यासोबत चुकीची माहिती जोडण्यात आली. इतकेच नव्हे तर, पीडितेच्या ओळखीच्या एका तरूणासोबत तिचे फोटो तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट पध्दतीने तयार केले आणि ते सार्वजनिकरीत्या प्रसारित केले. या कृत्यामुळे समाजात युवतीची बदनामी होऊन तिच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
सदरचा प्रकार 17 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:15 वाजेच्या दरम्यान घडला असून पीडित युवतीने 29 डिसेंबर 2025 रोजी दुपारी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित इन्स्टाग्राम खात्याच्या माहितीवरून तपासाला सुरूवात केली आहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अशा प्रकारे कोणाचेही बनावट खाते तयार करून बदनामी करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




