मुंबई । Mumbai
राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने मुंबई विमानतळावरून दोन फरार दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दोघे इस्लामिक स्टेट (ISIS) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर सेलचे सदस्य होते आणि गेल्या दोन वर्षांपासून फरार होते.
अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. हे दोघे जकार्ता (इंडोनेशिया) येथून भारतात परतण्याचा प्रयत्न करत असताना, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-2 टर्मिनलवर इमिग्रेशन विभागाने त्यांना पकडले. त्यानंतर एनआयएच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. अटक करण्यात आलेले शेख आणि खान हे 2023 मध्ये पुण्यात उघडकीस आलेल्या आयईडी बनवण्याच्या कटात सहभागी होते. पुण्यातील कोंढवा भागातील भाड्याच्या घरात अब्दुल्ला शेख यांच्या देखरेखीखाली या दहशतवाद्यांनी स्फोटके तयार केली होती.
2022 ते 2023 दरम्यान त्यांनी याच परिसरात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण शिबीर घेतले. केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर त्यांनी तयार केलेल्या आयईडीची चाचणीही नियंत्रित स्फोट करून केली होती. या कृत्यात तल्हा खान देखील सक्रिय सहभागी होता. शेख आणि खान हे आयसिसच्या त्या कटाचा भाग होते, ज्याद्वारे भारतात इस्लामिक राज्य स्थापनेचा प्रयत्न केला जात होता. या स्लीपर मॉड्यूलच्या सदस्यांनी भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचला होता. त्यामार्फत देशातील शांतता, सुरक्षाव्यवस्था आणि धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा हेतू होता. या प्रकरणात आधीच पुण्यातून अटक करण्यात आलेल्या आठ जणांविरुद्ध एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. अटकेत असलेले हे आठहीजण न्यायालयीन कोठडीत आहेत.
शेख आणि खान यांच्याविरुद्ध मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. दोघेही फरार असल्यामुळे त्यांच्याविषयी माहिती देणाऱ्यास प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. एनआयए गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा शोध घेत होती. त्यांच्यावर देशद्रोह, दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) गंभीर आरोप आहेत. त्यांची अटक ही एनआयएच्या तपासासाठी आणि देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
अटकेनंतर एनआयएने या दोघांना न्यायालयात हजर केले असून पुढील तपासासाठी कोठडीची मागणी करण्यात आली आहे. एनआयए त्यांच्याकडून अन्य साथीदारांविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तपास यंत्रणांचा अंदाज आहे की, हे दोघे परदेशातून भारतात पुन्हा कारवाया सुरू करण्याच्या उद्देशाने परत आले होते. त्यांच्या परदेशात राहण्याच्या काळातील संपर्क आणि आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे.
या अटकेमुळे संभाव्य दहशतवादी कारवाया टळल्या आहेत. एनआयएच्या सतर्कतेमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याआधीच मोठा कट उधळण्यात यश आले आहे. ही कारवाई देशातील स्लीपर मॉड्यूल्सच्या वाढत्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आयसिससारख्या संघटनांच्या माध्यमातून देशात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न सातत्याने होत असून, अशा कारवायांवर वेळेवर कारवाई करणे हे सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख उद्दिष्ट बनले आहे.