Saturday, November 23, 2024
Homeनाशिकनाशकात एनआयएचा छापा

नाशकात एनआयएचा छापा

मानवी तस्करी, हनी ट्रॅपप्रकरणी संशयित अटकेत

नाशिक ।प्रतिनिधी Nashik

देशातील मानवी तस्करी आणि एकूणच कोट्यवधी रुपयांचे सायबर फ्रॉड केल्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नाशिकमधून एका तरुणास अटक केली आहे. त्याच्याकडून महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आले असून यापूर्वी याच प्रकरणात एनआयएने पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान, या तपासात एनआयएने नाशिकमधून अटक केलेला सुदर्शन दराडे हा सहावा मुख्य संशयित असून हे सर्वच संशयित भारतातून परदेशात मानवी तस्करी, हनी ट्रॅप, क्रिप्टो करन्सी, स्टॉक मार्केट आणि परदेशात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांचा झोल करत होते, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

- Advertisement -

नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून देशातील तरुणांना परदेशात पाठवून त्यांना तेथे डांबून ठेवत सायबर फसवणुकीत गुंतवल्याच्या प्रकरणाचा छडा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या प्रकरणातून लावला आहे. दराडे हा संघटित तस्करी सिंडीकेटमध्ये थेट सहभागी होता. भारतीय तरुणांना परदेशात नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन परदेशात नेण्यासाठी त्याचा सहभाग होता. भारतीय तरुणांना लाओस, गोल्डन ट्रँगल एसईझेड आणि कंबोडिया येथे बनावट कॉल सेंटर्समध्ये काम करण्यास भाग पाडले जात होते. तसेच इतर ठिकाणी परदेशी संशयितांमार्फत हे सिंडीकेट चालवले जात असल्याचे समोर आले आहे.

यात भारतासह कंबोडिया, लाओस एसईझेड, यूएई आणि व्हिएतनामसारख्या इतर देशांतील संशयितांसोबत संबंध आढळून आले. आतापर्यंत अटक केलेले संशयित हे थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाममधील भारतीय तरुणांना लाओस एसईझेडमध्ये बेकायदेशीरपणे नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून कार्यरत असलेल्या तस्करांशी संगनमताने काम करत असल्याचा दावा एनआयएने केला आहे. तस्करी झालेल्या तरुणांना ऑनलाईन बेकायदेशीर कृत्ये करण्यास भाग पाडले गेले. ज्यात क्रेडिट कार्ड फसवणूक, बनावट अर्ज वापरून क्रिप्टो चलनात गुंतवणूक करण्यास भाग पाडणे, हनी ट्रॅप इत्यादी प्रकरणांमध्ये नागरिकांना बळी पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती. एनआयएच्या तपासानुसार, 27 मेपासून भारतातील विविध राज्यांमधून पाच संशयितांना अटक केली आहे. त्यानंतर नाशिकमधून सहाव्या संशयितास शुक्रवारी (दि.14) पकडले.

कागदपत्रे, इतर मुद्देमाल जप्त
एनआयएच्या पथकाने कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, बँक खात्यांचे तपशील इत्यादींसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. ज्याची तपासणी करून मानवी तस्करी आणि तरुणांकडून सायबर फसवणूक करवून घेतल्याचे प्रकरण उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंतरराष्ट्रीय सिंडीकेटच्या आदेशानुसार कार्यरत, तस्कर आणि सायबर घोटाळेबाज यांच्यात देशभरात संबंध असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याने 13 मे रोजी मुंबई पोलिसांकडून एनआयएने तपास हाती घेतला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या