शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
सावळीविहीर गावात नाशिककडे जाणार्या रोड लगत असणार्या दगडी खाणीत निघोज गावातील वैभव उर्फ सोनु धाकराव (वय 24) या तरूणाचा मृतदेह सोमवारी आढळून
आला आहे. मयत झालेला युवक हा घरातून बेपत्ता असल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात घरच्या लोकांनी दिली होती. शिर्डी येथील पोलीस निरीक्षक रणजित गंलाडे व पोलीस पथकाने घटनेनंतर सबंधित मृतदेहाची ओळख पटवली आहे.
शिर्डी अग्निशमन पथक व शिर्डी पोलीस यांनी अथक प्रयत्न करून सोमवारी मयत झालेल्या तरूणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्या तरूणाला पत्नी व दोन वर्षे वयाचा मुलगा आहे. याअगोदर देखील याच खाणीत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. दोन वर्षे झाली तरी तिची ओळख अद्याप पटली नाही. तिचा गळा दाबून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाल्यानंतर अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र या प्रकरणाचा तपास अद्याप लागलेला नाही. त्या खाणीला संरक्षण भिंत नाही. त्यामुळे या ठिकाणी असे प्रकार वारंवार घडत असून या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. या घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापयरत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.