मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात वादग्रस्त ट्विट करणाऱ्या निखिल भामरे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच कारण म्हणजे निखिल भामरेच्या खांद्यावर आता भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. निखिल भामरे याची भाजपच्या मीडिया सेलच्या सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सोशल मिडियात शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरे भाजप सोशल मिडियाचा सहसंयोजक झाला आहे. त्याची ही नेमणूक म्हणजेच समाजात विकृतीला खतपाणी घालण्याचा प्रकार आहे. हे काम भाजपच करत आहे. समाजात विष कालवणाऱ्या या विकृत कृतीचा तीव्र निषेध! भाजपच्या आणि त्यांच्या #मित्र_पक्षाच्या किती नेत्यांकडून या कृतीला विरोध होतो, हेच आता बघायचंय. हे ट्विट त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे.
काय आहे प्रकरण?
निखिल भामरे हा नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आहे. त्याने गेल्यावर्षी शरद पवार यांच्याविषयी मोठं वादग्रस्त ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये लिहिलं होतं, “वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग.” या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता. निखिल भामरे याच्यावर राज्यभरात ७ वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला अटकही करण्यात आली होती. यानंतर निखिल भामरे ५० दिवस तुरुंगात होता. महिनाभरानंतर त्याची जामीनावर सुटका झाली. सुटका झाल्यानंतर त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले होते.