Monday, July 1, 2024
Homeनगरपारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेडने लंकेंच्या तुतारीत हवा फुंकली!

पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेडने लंकेंच्या तुतारीत हवा फुंकली!

लोकसभेची मतविभागणी || विखेंना नगर शहर, राहुरी, शेवगाव-पाथर्डीची साथ

अहमदनगर | ज्ञानेश दुधाडे | Ahmednagar

- Advertisement -

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांचा 29 हजारांहून अधिक मतांनी शरद पवार गटाचे नीलेश लंके यांनी पराभव केला. या निवडणुकीत 2019 च्या तुलनेत विखे यांना 1 लाख 8 हजार 792 मते कमी मिळाली. याशिवाय मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातून विखे यांचे मताधिक्य कमालीचे घटले. या निवडणुकीत लंके यांना स्वत:च्या पारनेर तालुक्याने विजयासाठीचे निर्णायक मताधिक्य दिले. याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातून लंके यांना भक्कम साथ मिळाली, तर विजयाच्या आकडेवारीत कर्जत-जामखेड तालुक्याने भर घातली. यामुळे राजकीय अस्तित्वाच्या लढाईत लंके यांनी बलाढ्य प्रतिस्पर्धी विखे यांच्यावर मात केली.

मंगळवार (दि.5) रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निकालाच्या 27 फेर्‍यांमध्ये सुरूवातीच्या 6 आणि 20 वी, तसेच 21 वी फेरी वगळता विखे यांना उर्वरित एकाही फेरीत मताधिक्य मिळाले नाही. मतमोजणीअखेर लंके यांनी विखे यांचा 29 हजारांहून अधिक मतांनी पराभव केल्याचे जाहीर झाल्यानंतर विधानसभानिहाय मतदानाच्या आकडेवारीत विखे यांना 2019 तुलनेत मतदारसंघातील एकाही विधानसभा मतदारसंघात मते कायम राखता आले नसल्याचे समोर आले. 2019 च्या निवडणुकीत विखे यांना 7 लाख 4 हजार 660 मते मिळाली होती. यंदा 5 लाख 95 हजार 868 मते मिळालेली आहेत. म्हणजे विखे यांच्या मतांमध्ये तुलनेत 1 लाख 8 हजारांची घट झाली. मतदारांचा मूड ओळखण्यात विखे आणि भाजप सपशेल अपयशी ठरले असल्याचे या मतांमधून दिसत आहे.

दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर आमदारकीचा राजीनामा देऊन नवे चिन्ह, नवा पक्ष घेवून मतदारांना साद घालणार्‍या लंके यांनी विखे यांचा पराभव केला. मतदान होण्यापूर्वी जाहीर सभेत, मतदान होतांना आणि मतदान झाल्यावर ‘नगर दक्षिण लोकसभेत माझाच विजय होणार’ हे छातीठोकपणे सांगताना लंके यांचा आत्मविश्वास कधीच कमी झालेला दिसला नाही. कर्जत-जामखेड तालुक्यात लंके यांना 1 लाख 4 हजार 963 मते मिळाली तर विखे यांना 95 हजार 835 मते मिळाली. याच तालुक्यात 2019 ला विखे यांना 36 हजार 709 मतांची आघाडी होती. यंदा तालुक्यातील बड्या नेत्यांना सोबत घेण्यात विखे यांना यश आले असले तरी मतदारांनी पाठ दाखवली आहे.

गत पंचवार्षिकला सुमारे 72 हजारांचे मताधिक्य देणार्‍या राहुरी तालुक्यातून यंदा विखे पिछाडीवर राहणार असल्याची जोरदार चर्चा मतदानानंतर होती. शरद पवार राष्ट्रवादीचे नेते आ.प्राजक्त तनपुरे यांच्या समर्थकांकडून यंदा विखे यांना राहुरी तालुक्यातून मताधिक्य मिळणार नाही, असे छातीठोकपणे सांगितले जात होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात राहुरी तालुक्यातील नेते, कार्यकर्त्यांशी जुळवण्यात विखे यांना यश आले. मात्र, स्पर्धक उमेदवारावर निर्णायक आघाडीसाठी ते उपयोगी ठरले नाही. यावेळी राहुरी तालुक्यातील मतदारांनी विखे यांना 11 हजार 936 मतांची आघाडी दिली. शेवगाव-पाथर्डी या भाजपच्या बालेकिल्ल्यात विखे यांना 2019 च्या निवडणुकीत 60 हजारांचे मताधिक्य होते. ते यंदा घटून अवघे 7 हजार 841 झाले आहे. विशेष म्हणजे शेवगाव तालुक्यात लंके यांच्या प्रचारात मोठे नाव नसताना मतदारांनी लंके यांना विखे यांच्या बरोबरीने मतदान केले.

नगर शहरात गत निवडणुकीत विरोधात लढणारे आ. संग्राम जगताप यावेळी विखे यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करत होते. 2019 ला विखे यांना नगर शहारातून 53 हजार 122 मतांची आघाडी मिळाली होती. यंदा किमान तेवढी आघाडी मिळेल, असा दावा विखे समर्थकांकडून होता. मात्र, यंदा नगर शहरातून विखे यांना 31 हजार 586 मतांची आघाडी मिळाली. त्यावेळी सोबत असणारा ठाकरे शिवसेनेचा गट यावेळी लंके यांचासोबत राहिल्याचे दिसत आहे. नगरमधील सोयरे-धायर्‍यांचे राजकारण विखे यांच्या अंगलट असल्याची चर्चा देखील निकालानंतर झडतांना दिसत आहे. सर्वात मोठाफटका विखे यांना श्रीगोंदा तालुक्यात बसलेला दिसत आहे. लंके यांनी श्रीगोंदा तालुक्यातून 32 हजार 711 मतांची आघाडी घेतली. याठिकाणी महायुतीच्या नेत्यांची मोठी गर्दी विखे यांच्या गोटात दिसली. हे नेते वेगवेगळ्या पक्षात आणि गटात असले तरी त्यांची राजकीय महत्वाकांक्षा वेगवेगळी असल्याने त्यांचा फटका विखे यांना बसला आणि लंके यांना मोठे मताधिक्य मिळाले. याठिकाणी एकटे राहुल जगताप यावेळी लंके यांना साथ देताना दिसले.

नाराज गट नाराजच !
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपमधील एक गट शेवटपर्यंत नाराज असल्याची चर्चा होती. त्यांची नाराजी काढण्यात विखे यांना यश आले नाही. प्रचारात देखील विखे यांच्या यंत्रणेशिवाय पक्षाचे फारसे नेते सक्रीय दिसून आले नाही. नगर तालुक्यातील एका नेत्यामुळे शिवसेना, काँग्रेसचे अनेक तालुका पातळीवरील नेते विखे यांच्यापासून दूरावले गेले. या नेत्यांनी नगर-पारनेर, नगर-श्रीगोंदा आणि राहुरी- नगर-पाथर्डी या मतदारसंघात लंके यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी मोठे कष्ट उपसले. विखे यांनी नगरमधील एका टोपीबाज नेत्याला फार महत्व दिले नसते, तर त्याचा फायदा झाला असता, अशी चर्चा आता विखे यांच्या गोटातच होताना दिसत आहे.

रिपोर्टींग चुकले
विखे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षासोबत स्वत:ची यंत्रणा लावली होती. ही यंत्रणा दररोज नगर दक्षिणेतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आणि गावात जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या यंत्रणेने वेळीच आपल्या नेत्यांना योग्य ग्राऊंड रिपोर्ट दिला नाही, अशी चर्चा निलकानंतर सुरू झाली आहे. काहींनी दिशाभूल करणारी माहिती सादर केली, यामुळेच यंदा विखे यांचा अंदाज चुकला असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे लंके यांच्यासाठी उत्तरेतील दोन बड्या नेत्यांनी यंत्रणा आणि रसद पुरवली. संगमनेर येथून लंकेंच्या प्रचारासाठी 700 गाड्यांचा ताफा दक्षिणेत राबत होता, असाही दावा केला जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या