Thursday, June 13, 2024
Homeनगरनिळवंडे कालव्यातून पाणी सोडण्याची घाई अधिकार्‍यांनी कुणाच्याही दबावाखाली करु नये

निळवंडे कालव्यातून पाणी सोडण्याची घाई अधिकार्‍यांनी कुणाच्याही दबावाखाली करु नये

अकोले |प्रतिनिधी| Akole

- Advertisement -

निळवंडे डाव्या कालव्याचे काम करताना झालेला हलगर्जीपणा पहिल्या पाणी सोडण्याच्या चाचणीत उघड झाला आहे. त्यावेळी तालुक्यातील काही गावांमधील शेतकर्‍यांच्या शेत जमीनींचे आणि पिकांचे झालेले नुकसान विचारात घेता निळवंडे कालव्यातून पाणी सोडण्याची घाई आधिकार्‍यांनी कोणाच्याही दबावाखाली येवून करु नये अन्यथा पुन्हा धरणावर जावून आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या व अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनिताताई भांगरे यांनी दिला आहे.

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्रीमती भांगरे यांनी म्हटले आहे की, निळवंडे डाव्या कालव्यातून पाण्याची चाचणी घेण्यासाठी 31 मे 2023 रोजी पाणी सोडण्याची घाई करण्यात आली. वास्तविक या कालव्यांची कामे अद्यापही पुर्ण नाहीत अनेक ठिकाणी कामामध्ये निष्काळजीपणा झाला असल्याने प्रथम चाचणीचे पाणी निंब्रळ, तिटमेवस्ती, मेहेंदुरी या गावातील शेतकर्‍यांच्या शेतामध्ये तसेच कालव्या जवळील काही घरांमध्ये गेल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही वस्तुस्थिती आपण त्याच वेळी आंदोलन करुन, जलसंपदा विभागाच्या आधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देत पाणी तातडीने बंद करण्याची मागणी केली होती.

आता पुन्हा याच डाव्या कालव्यामधून पाणी सोडण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. केवळ काही लोकांच्या हट्टासाठी या कालव्यातून पाणी सोडण्याची प्रक्रीया होणार असेल तर अकोले तालुक्यातील शेतकरी ती यशस्वी होवू देणार नाहीत. आधी कालव्यातील सर्व कामे पुर्ण करा, ज्या भागामध्ये पाण्याची गळती होते, पाण्याचा झिरपा होतो अशा भागातील कामांच्या पुर्ततेबाबतचे सर्व निकष पुर्ण करुनच कालव्यातून पाणी सोडावे ही आमची मागणी आहे. कालव्यांच्या कामातील चुकांकडे दुर्लक्ष करुन, जलसंपदा विभागाने कोणाच्या दबावाखातर किंवा कोणाच्या आदेशाने पाणी सोडले तर, तिव्र आंदोलन करण्याच इशारा आम्ही आजच देत आहोत.

मागील वेळी शेतकर्‍यांचे नुकसान झाले त्याचीच भरपाई शासन अद्याप देवू शकलेले नाही. आता पुन्हा या कालव्यांच्या पाण्यामुळे होणार्‍या नुकसानीचा बोजा अंगावर घेण्याची मानसीकता या भागातील शेतकर्‍यांची नाही, त्यामुळे शेतकर्‍यांच्या भावनांचा विचार करुन, जलसंपदा विभागाने डाव्या कालव्यातून पाणी सोडताना गांभिर्याने विचार करावा अन्यथा होणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल. या संदर्भात आम्ही दोनच दिवसांमध्ये शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ घेवून जलसंपदा विभागाच्या आधिकार्‍यांना भेटणार असल्याचेही श्रीमती भांगरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या