Friday, September 20, 2024
Homeनगरनिळवंडे कालव्याच्या कामासाठी जलशक्ती मंत्रालयाचा निधी मिळावा

निळवंडे कालव्याच्या कामासाठी जलशक्ती मंत्रालयाचा निधी मिळावा

ना.विखे यांची मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे मागणी

राहाता |प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या राहिलेल्या कामांसाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने अधिकचा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्याकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ना. सी. आर. पाटील यांना ना. विखे पाटील यांनी निळवंडे प्रकल्पाच्या संदर्भात सविस्तर पत्र दिले. जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या सद्यस्थितीची तसेच या धरणासाठी राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली आहे.

या धरणाचे काम कालव्यांसह पूर्ण व्हावे यासाठी राज्य सरकारने 5 हजार 177 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिल्याने धरणाच्या कालव्यांची कामे मार्गी लागत आहेत. मात्र लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी आवश्यक असलेल्या कामांसाठी अधिकच्या निधीची गरज असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. निळवंडे प्रकल्पाच्या पुर्ततेकरिता केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जलशक्ती मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

या प्रस्तावावर उचित कार्यवाही करून शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करून जलशक्ती मंत्रालयाने निधीची उपलब्धता करून देण्याची मागणी ना. विखे पाटील यांनी केली आहे. जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांच्या माध्यमातून लाभक्षेत्रात पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रथम चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतरही उजव्या आणि डाव्या कालव्यातून आवर्तनही सोडण्यात आले होते. याचा मोठा दिलासा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मिळत आहे. राज्या बरोबरच केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचा निधी उपलब्ध झाल्यास कालव्यांची उर्वरित कामे निर्धारित वेळेत मार्गी लागतील, असा विश्वास मंत्री विखे पाटील पाटील यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या