Friday, September 25, 2026
HomeनगरBhandardara : निळवंडेही ओव्हरफ्लो; मुळात 9541 क्युसेकने विसर्ग

Bhandardara : निळवंडेही ओव्हरफ्लो; मुळात 9541 क्युसेकने विसर्ग

700 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडले || पांजरे-वारंघुशीत भूस्खलन, भातशेतीचे नुकसान

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटात आषाढ सरींचे तांडव सुरूच असून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणातून पाणी सोडल्यानंतर आता निळवंडे धरणही काल ओव्हरफ्लो झाले. भंडारदरातून आवक मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत असल्याने निळवंडे धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडण्याचे प्रमाणही वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

पाणलोटात गत आठवडाभरापासून आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य केल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक सुरू असल्याने पाणीसाठा स्थिर ठेऊन येणारे पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. काल सायंकाळी धरणातील पाणीसाठा 10037 दलघफू (90.92टक्के) कायम ठेवून 11922 क्युसेक तसेच वाकीचा ओव्हरफ्लो 1573 क्युसेक असा एकूण 13495 क्युसेकने निळवंडे धरणात आवक होत असल्याने या धरणातील पाणीसाठा क्षणाक्षणाला वाढत आहे. परिणामी 7197 दलघफू (86.36टक्के) पाणीसाठा कायम ठेवून 700 क्युसेकने धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. आवक कायम असल्याने विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरा धरणात 1227 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. यासह 1869 दलघफू पाणी निळवंडेत जमा झाले. पाणलोटात अजूनही अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने धरणात आवक वाढली आहे. आढळा धरणही तुडुंब असून या धरणातून 433 ने विसर्ग सुरू आहे. पाणलोटात अतिवृष्टी झाल्याने आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मुळात 9541 क्युसेकने विसर्ग

कोतूळ |वार्ताहर| Kotul

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक पाणीक्षमता असलेले मुळा धरणातील पाणीसाठा 13493 दलघफू झाला आहे. पाणलोटात पाऊस कमी झाल्याने मुळा नदीतील कोतूळ येथील विसर्ग 9541 क्युसेकपर्यंत घटला आहे. गत पाच-सहा दिवसांपासून पाणलोटात जोरदार पाऊस होत असल्याने मुळा धरणात मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने या धरणातील पाणीसाठा 52 टक्क्यांवर गेला आहे.

Akole : पांजरे-वारंघुशीत भूस्खलन, भातशेतीचे नुकसान

ढगफुटीसदृश पावसामुळे ओढ्यांनी बदलला मार्ग || घरांमध्ये पाणी, वीज यंत्रणा विस्कळीत

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीने पांजरे, वारंघुशी, बारी, पेंडशेत, रतनवाडी, मुदखेल आदी आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर हानी झाली. सकाळी साडेसहा वाजता ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्याने पांजरे येथील कुंभारदरा परिसरात मोठे भूस्खलन झाले. डोंगरावरील माती, दगड आणि मोठमोठी झाडे वाहून खाली आली. सुमारे 25 ते 30 शेतकर्‍यांच्या भातशेतीतून पाण्याचा प्रचंड लोंढा गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. ओढ्यांनी रौद्ररूप धारण करत प्रवाहाचा मार्ग बदलला, शेतीचे बांध फुटले आणि काही घरांमध्ये पाणी शिरले. तातडीच्या पंचनाम्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.

माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे, वसंत सोनवणे, सुनील पवार, यशवंत उघडे, रामनाथ उघडे, सोमनाथ गांगड, विलास उघडे, लक्ष्मण उघडे, धोंडू गांगड, भाऊ गांगड आदींसह ग्रामस्थांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकर्‍यांना धीर दिला. मंडलाधिकारी, तलाठी कर्मचारी तसेच संबंधित अधिकार्‍यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सर्व नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. तहसीलदारांनी एकही पात्र नुकसानग्रस्त पंचनाम्यापासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही दिली.

दरम्यान, वारंघुशी येथे खांडीत मोठे भूस्खलन होऊन रस्त्यावर माती, दगड व झाडे कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अंभोरे व येवले यांना कळविण्यात आले. प्रशासनाने तातडीने यंत्रणा पाठवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम सुरू केले. बारी गावात अतिवृष्टीमुळे राजाराम भारमल यांच्या घरावरील पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले. या ठिकाणीही तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वादळ व मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये महावितरणचे वीज खांब कोसळले, तर अनेक ठिकाणी वीजतारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला.

अनंत घाणे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता डी. वाय. सोनवणे यांच्याशी संपर्क साधून तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची मागणी केली. महावितरणने मनुष्यहानी टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. ज्या शेतकरी व नागरिकांचे शेती, घरे किंवा इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून पंचनामे करून घ्यावेत. शासनाच्या मदतीपासून कोणताही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही, यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत, असे आवाहन अनंत घाणे यांनी केले.

डिंभे ओव्हरफ्लोच्या मार्गावर

गत वर्षीच्या तुलनेत 12 टक्क्यांपेक्षाही अधिक पाणीसाठा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कुकडी खोर्‍यात आषाढ सरी जोरदार कोसळत असल्याने दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी प्रकल्प समूह धरणात नवीन पाण्याची आवक जोमाने सुरू आहे. 13500 दलघफू क्षमतेच्या डिंभे धरणातील पाणीसाठा काल 11926 दलघफू (87.44 टक्के) झाला आहे.
गत 36 तासांत तब्बल 2651 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे कुकडी समूह धरणांमध्ये एकूण उपयुक्त साठा काल दुपारी 4 वाजता 19651 दलघफू (66.22 टक्के) झाला होता. याच दिवशी गतवर्षी हा पाणीसाठा 16214 दलघफू (54.63 टक्के) होता. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा आहे. दरम्यान पाण्याची आवक वाढतच असल्याने वडज धरणातील पाणीसाठा स्थिर ठेऊन या धरणातून 1800 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. या धरणात एकूण उपयुक्त पाणीसाठा 82.40 टक्के आहे. माणिकडोह 46.62 टक्के, विसापूर 93 टक्के, घोड 99.60 टक्के होता.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...