Monday, January 19, 2026
HomeनगरNilwande Dam : निवडणुकीच्या तोंडावर निळवंडेचे राजकारण तापले; सर्वेक्षणाच्या घोषणांवरून लाभार्थी शेतकरी...

Nilwande Dam : निवडणुकीच्या तोंडावर निळवंडेचे राजकारण तापले; सर्वेक्षणाच्या घोषणांवरून लाभार्थी शेतकरी आक्रमक

कोपरगाव (प्रतिनिधी)

उत्तर नगर आणि नाशिक जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांचे नंदनवन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या निळवंडे धरणाचे पाणी अद्याप मूळ लाभक्षेत्राला पूर्णपणे मिळालेले नसताना, आता नवीन गावांच्या सर्वेक्षणाच्या घोषणांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

- Advertisement -

धरणाची क्षमता न वाढवता केवळ निवडणुकीच्या तोंडावर पाण्याचे वाटप करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत निळवंडे कालवा कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

YouTube video player

नुकतीच संगमनेर येथील जलसंपदा विभागात आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निळवंडेच्या डाव्या आणि उजव्या कालव्यावरून वंचित राहिलेल्या गावांना पाणी देण्याचे सुतोवाच केले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार मालदाड, सायखिंडी, मेंढवण, वेल्हाळे यांसह अनेक गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून लवकरच प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होईल, अशी घोषणा आ. खताळ यांनी केली. मात्र, या घोषणेनंतर निळवंडे कालवा कृती समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मूळ आराखड्यातील १८२ गावे अद्याप हक्काच्या पाण्यापासून वंचित असताना नवीन गावांना पाणी देण्याच्या घोषणा करणे म्हणजे केवळ ‘निवडणूक स्टंट’ आहे. जर खरंच नवीन गावांना पाणी द्यायचे असेल, तर प्रथम निळवंडे धरणाची उंची वाढवून साठा १५ टीएमसी पर्यंत वाढवावा, अशी मागणी समितीने केली आहे. या प्रकल्पासाठी कालवा कृती समितीने पत्रकार नानासाहेब जवरे, विक्रांत काले यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.

दुसरीकडे, चिंचोली गुरव परिसरातील पाईपलाईन नेटवर्कमध्ये (पी.डी.एन.) तांत्रिक त्रुटीमुळे ३०० हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित राहणार असल्याचे समोर आले आहे. याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधूनही काहीच कार्यवाही होत नसल्याची खंत प्रकाश सोनवणे यांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या काळात आश्वासनांची खिरापत वाटण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर पाण्याचे नियोजन करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाऊसाहेब सोनवणे, बाळासाहेब सोनवणे आणि सहकाऱ्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra MC Mayor Reservation : २९ महापालिकांतील महापौरपदाची आरक्षण सोडत ‘या’ तारखेला...

0
मुंबई | Mumbai राज्यातील २९ महापालिकांची निवडणुकीची (Municipal Corporation) प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व राजकीय पक्षांना महापौरपदाचे (Mayor Post) वेध लागले आहे. मुंबईसह, ठाणे,पुणे, पिंपरी...