Monday, June 24, 2024
Homeनगरनिळवंडे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे प्रवरा नदी दुथडी

निळवंडे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे प्रवरा नदी दुथडी

अकोले |प्रतिनिधी| Akole

- Advertisement -

भंडारदरा धरणातून 7 हजार 678 क्युसेक तर निळवंडे धरणातून 7 हजार 800 क्युसेक विसर्ग सुरू आहे. निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे प्रवरा नदीच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. अकोले येथील अगस्ति सेतू पूल पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर वाढल्यास निळवंडेच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. काल रविवारी दुपारपर्यंत भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे भंडारदर्‍याच्या विसर्गात कालच्या तुलनेत वाढ करण्यात आली. सकाळी भंडारदरा धरणाचा विसर्ग 5 हजार 438 क्युसेक होता. सायंकाळी तो 7 हजार 678 क्युसेक करण्यात आला. भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी निळवंडे धरणात जमा होते. भंडारदरा ते निळवंडे धरण दरम्यानचे ओढे नाले तसेच कृष्णवंती नदीलाही चांगले पाणी आले आहे.

हे सर्व पाणी रंधा धबधब्या जवळ निळवंडे धरणात पडते. या पाण्यामुळे रंधा धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे. भंडारदरा धरणाचा विसर्ग वाढविला की निळवंडे धरणाचा विसर्गही त्या प्रमाणात वाढविला जातो. काल रविवारी सकाळी निळवंडेचा विसर्ग 5 हजार 480 क्युसेक होता. सायं. तो 7 हजार 800 क्युसेक करण्यात आला. प्रवरा नदीची पाणी पातळी वाढत असल्यामुळे नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्याच्या पूर्वभागातही काल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सुकू लागलेल्या खरीप पिकांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज सकाळपर्यंतचा पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे- घाटघर 114, रतनवाडी 110, पांजरे 89, भंडारदरा 73, वाकी 53, निळवंडे 18, अकोले 6, कोतुळ 5, भंडारदरा येथे दिवसभरात 30 मिमी पावसाची नोंद झाली. धरणांमधील पाणी साठा दलघफू भंडारदरा 11 हजर 39 (100 टक्के), निळवंडे 7 हजार 112 (85.40 टक्के) आढळा 915 (86.32 टक्के) मुळा धरणाचा पाणी साठा सकाळी 21 हजार 145 दलघफु (81.33 टक्के) होता. तर कोतुळ जवळ मुळा नदीचा विसर्ग 2 हजार 984 क्युसेक होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या