भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara’
पाणलोटात पाऊस सुरू असल्याने भंडादरातून प्रवरा नदीत 1928 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तसेच कृष्णवंती नदी वाहती असल्याने निळवंडे धरणात पाण्याची आवक होत आहे. 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा काल गुरूवारी सायंकाळी 4732 दलघफू (56.82टक्के) झाला होता. आज हे धरण 60 टक्के भरण्याची शक्यता आहे.
पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्या घाटघर आणि रतनवाडीत मंगळवारी रात्रीपासून पावसाचा काहिसा जोर वाढल्याने भंडारदरातील पाणीसाठा नियंत्रणासाठी प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. काल दिवसभरात धरणात 145 दलघफू पाण्याची आवक झाली. 77 दलघफू पाणी सोडण्यात आले. या धरणातील पाणीसाठा 10313 दलघफू (93.42 टक्के) ठेऊन येणारे पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. काल सायंकाळी या धरणातून 1928 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. तसेच वाकी तलावातून 556 क्युसेकने ओव्हरफ्लो सुरू आहे. त्यामुळे निळवंडेचे पोट वाढू लागले आहे. काल दिवसभरात भंडारदरात 22 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची आवक पाहता आज हे धरण 60 टक्के भरण्याची शक्यता आहे.