राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे संपूर्ण काम अपूर्ण असताना, केवळ लोकसभेची आचारसंहिता लागेल या भीतीने अपूर्ण कामाचे लोकार्पण करण्याचा खटाटोप शासनाच्यावतीने करण्यात आला व तोही विश्वनेते म्हणून गणल्या जाणार्या देशाचे पंतप्रधान यांच्याहस्ते करणे हा शासनाचे अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका राज्याचे माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.
पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी विद्यमान सरकारच्या गतिमंद कामावर व खोट्या प्रसिद्धीच्या खटाटोपावर ताशेरे ओढले, वास्तविक मागील पाच वर्षांच्या भाजप सरकारच्या काळात जेवढा निधी निळवंडे च्या कामासाठी दिला गेला. त्यापेक्षा महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर करोना काळ असूनही प्रत्येक वर्षी तेवढा निधी निळवंडेच्या कामासाठी दिला गेला. तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी निळवंडेच्या कामाबाबत अडीच वर्षात तीन ते चार वेळा स्वतः येऊन आढावा घेतला व वेळोवेळी अधिकार्यांना कामाच्या गतिमानतेबाबत सूचना केल्या.
तत्कालीन मंत्री आ. बाळासाहेब थोरात व आपण स्वतः कामाच्या बाबतीत येणार्या अडचणींबाबत स्पॉटवर अधिकार्यांसह बैठका घेऊन अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. काही अडचणी तात्काळ सोडविल्या गेल्या. यातून राहुरी तालुक्यात पाणी येण्यासाठी अडसर ठरणार्या बोगद्यांचे काम मार्गी लागले. वनविभागाच्या अडचणी बाबत नागपूरपर्यंत फायलींचा प्रवास वेगाने पूर्ण करून घेतला व कामाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने महाविकास आघाडी शासन गेल्यानंतर जवळपास आठ ते नऊ महिने हे काम बंद अवस्थेत होते. गौण खनिजापासून इतर अडचणी ठेकेदारांसमोर होत्या. ज्या शासनाने डाव्या कालव्यांची चाचणी घेण्याचा घाईघाईत खटाटोप केला. त्यांनीच उजव्या कालव्याचे कामही दोन महिन्यांत पूर्णत्वास जाण्याचा शब्द देऊन आजही हे काम पूर्ण झाले नाहीच.
या शासनाबद्दल मराठा समाज, शेतकरी व अन्य घटकांत मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याने दहा वर्षांपूर्वी ज्या नरेंद्र मोदी यांच्या सभेला स्वतःहून लोक गर्दी करत होते. तेच लोक आज सभेसाठी जाण्यास तयार दिसत नव्हते. आयोजकांना सभेला गर्दी करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेचा वापर करावा लागला. पैसे देऊन ही लोक गाड्यात बसत नसल्याचे विदारक चित्र दिसत असताना शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना बळजबरीने कार्यक्रमस्थळी गर्दी जमवण्यासाठी नेण्यात आल्याचे दिसून आले, अशी प्रतिक्रिया यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.