Saturday, July 27, 2024
Homeनगरआवर्तन थांबविण्यासाठी आज निळवंडेचे चाकबंद आंदोलन

आवर्तन थांबविण्यासाठी आज निळवंडेचे चाकबंद आंदोलन

अकोले |प्रतिनिधी| Akole

निळवंडे धरणाचे दीर्घकाळ सुरू असणारे आवर्तन त्वरित थांबवावे यासाठी अकोले तालुका पाणी हक्क संघर्ष समितीने आज दि. 24 रोजी निळवंडे धरणाचे चाकबंद आंदोलन करण्याची हाक दिली आहे. या आवर्तनात निळवंडे धरणातून अमाप पाणी वाहून नेले जात असून त्यामुळे निळवंडे व भंडारदरा ही दोन्ही धरणे रिकामे होण्याच्या मार्गावर आहे. हे आवर्तन बंद केले नाही तर भविष्यात पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहणार नाही,असा संघर्ष समितीचा दावा आहे. आज आ. डॉ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर चाकबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे प्रवरा व निळवंडे कालव्यांमधून सोडलेले पाणी बंद करावे, या मागणीसाठी शुक्रवारी निळवंडे धरणाचे चाकबंद आंदोलन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान सुगाव येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मृतदेह काढण्यासाठी आवर्तन थांबवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहे. मात्र असे असले तरी पाणी वाहून नेण्याचा प्रयत्न ते पुन्हा नक्कीच करतील त्यामुळे आवर्तन तात्पुरते थांबवले असेल तरी शुक्रवारी आंदोलन होईलच, असे माकपचे नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले. आंदोलनासाठी सकाळी 8 वाजता निळवंडे धरणावर उपस्थित राहण्याचे आवाहनही डॉ. नवले यांनी केले आहे. निळवंडे व भंडारदर्‍याच्या सध्या सुरू असणार्‍या आवर्तनात साडेतीन टीएमसीपेक्षा जास्त पाणी वापर झाला आहे. पाण्याच्या या उधळपट्टीमुळे या दोन्ही धरणांनी तळ गाठला आहे. 27 एप्रिलपासून निळवंडे धरणातून सिंचनाचे आवर्तन सुरू आहे.

हे आवर्तन सुरू झाले त्यावेळी भंडारदरा धरणात 3 हजार 343 दलघफू आणि निळवंडे धरणात 2 हजार 548 दलघफू पाणी शिल्लक होते. दोन्ही धरणे तीस टक्के भरलेली होती व दोन्ही धरणांत मिळून एकूण 5 हजार 891 दलघफू पाणी शिल्लक होते. गुरुवारी सकाळी भंडारदर्‍याचा पाणीसाठा 1 हजार 277 दलघफू तर निळवंडेचा 951 दलघफू होता, म्हणजे दोन्ही धरणांत मिळून फक्त 2 हजार 228 दलघफू पाणी शिल्लक आहे. आवर्तनाच्या फक्त सव्वीस दिवसांत तब्बल 3 हजार 663 दलघफू पाण्याचा वापर झाला. यामुळे दोन्ही धरणांचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावला असून दोन्ही धरणांत प्रत्येकी अकरा टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात हे आवर्तन तातडीने न थांबवल्यास अकोले तालुक्याल भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या