Friday, September 20, 2024
Homeनगर… अखेर आश्वासनानंतर निळवंडेचे चाकबंद आंदोलन थांबले

… अखेर आश्वासनानंतर निळवंडेचे चाकबंद आंदोलन थांबले

अकोले |प्रतिनिधी| Akole

- Advertisement -

निळवंडे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याचे आवर्तन थांबविण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सोमवारी (दि. 9 सप्टेंबर) चाकबंद करण्याचा अयशस्वी प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला. अखेर जलसंपदा अधिकार्‍यांनी आश्वासन दिल्यानंतर दीड तासांनी आंदोलन थांबविण्यात आले. निळवंडे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या निकृष्ट कामाविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने अनेकवेळा लेखी, तोंडी मागणी करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने चाकबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सकाळी 10 वाजता हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. साडेअकरा वाजता आंदोलन थांबविण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत हातात दगड घेऊन कुलूप तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना गेटजवळ रोखून धरले. त्यामुळे आंदोलकांचा चाकबंदचा प्रयत्न सपशेल फसला. आवर्तन बंद केले नाही तर पाण्यात उड्या मारण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी प्रशासनास दिला होता. काही वेळ वातावरण संतप्त बनले होते. यावेळी जलसंपदाचे अधिकारी प्रदीप हापसे व प्रमोद माने यांनी उजव्या व डाव्या कालव्याच्या गळतीमुळे ज्या शेतकर्‍यांचे दोन वर्षांत नुकसान झाले त्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत नुकसान भरपाई दिली जाईल, रेड झोन असणार्‍या कालव्याची गळती असणार्‍या ठिकाणी काँक्रिटीकरण केल्याशिवाय पुढे पाणी सोडणार नाही, सध्या सुरू असणारे दोन्हीही कालव्यांचे पाणी 25 सप्टेंबर ऐवजी 20 सप्टेंबर म्हणजे पाच दिवस आधी बंद करण्यात येईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. यात महिला आंदोलकांचा व स्थानिक कार्यकर्त्यांचा समावेश होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या