संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील मिर्झापूर रोडवर निळवंडे उजव्या कालव्याच्या पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या कामासाठी आणण्यात आलेले लोखंडी गज (स्टील) हे लेबर ठेकेदाराने दोघाजणांना चोरुन विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 400 किलो स्टील पोलिसांनी जप्त केले आहे.
विष्णू गोपाळराव पालनकर (रा. परभणी, हल्ली रा. धांदरफळ, ता. संगमनेर), गणेश सावळेराम खताळ व बाळासाहेब सावळेराम खताळ (दोन्ही रा. धांदरफळ, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. निळवंडे उजव्या कालव्यावरील पुलांच्या कामांचे काम मिर्झापूर शिवारात सुरू आहे. या कामासाठी ठेकेदाराने मोठ्या प्रमाणावर स्टील आणले. मात्र या स्टीलमधील 12 एम.एम जाडीचे 24 हजार रुपये किमतीचे 400 किलो स्टीलची चोरी ही लेबर ठेकेदार विष्णू गोपाळराव पालनकर याने केली व सदर स्टील हे धांदरफळ गावातील गणेश खताळ व बाळासाहेब खताळ यांना विकले. याबाबत ठेकेदार सतीश तुकाराम येवले (रा. झोळे, ता. संगमनेर) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 551/2021 भारतीय दंड संहिता 379, 411, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास केला असता सदर स्टील हे गणेश खताळ व बाळासाहेब खताळ यांच्या घराच्या पोर्चमध्ये मिळून आले. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र सहाणे करत आहेत.