संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले असून त्यांच्या सततच्या कामामुळे व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेच्या मदतीमुळे कालव्यातून संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांना भर उन्हाळ्यात पाणी मिळाल्याने मोठा दिलासा मिळत असल्याचे लाभधारक शेतकरी म्हणतायेत.
सध्या निळवंडेच्या दोन्हीही कालव्यांमधून उन्हाळी आवर्तन सुरू आहे. याबाबतची मागणी माजी मंत्री थोरात यांनी केली होती. सध्या तळेगाव विभागातील गावांना या कालव्यातून पाणी देण्यात येत आहे. हे पाणी पोहोचवण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेच्या माध्यमातून काम झाले आहे. विविध ठिकाणी चर टाकण्यात आले आहे. यामधून विविध गावांमधील बंधारे भरण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर कारखान्याच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचे पाईप शेतकर्यांना उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामधून पाणी उचलले जात आहे. उजव्या कालव्यावरील निमगाव बुद्रुक, नांदुरी दुमाला, धुपे, हिवरगाव पावसा, शिरापूर ते झरेकाठीपर्यंत विविध गावांतील शेतकर्यांनी पाईपाच्या माध्यमातून पाणी उचलले आहे.
यामुळे अनेक गावांमध्ये शेततळी भरली असून भर उन्हाळ्यामध्ये शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. निळवंडे धरण व कालवे हे दुष्काळी गावांसाठी असून या उन्हाळ्यामध्ये आवर्तन मिळाल्याने शेतकरी आनंदी झाले असल्याचे चिंचोली गुरव येथील शेतकरी संदेश गोडगे म्हणाले. तर कोणतीही काम सहजासहजी होत नाही, सातत्याने पाठपुरावा करून माजी मंत्री थोरात यांनी धरण पूर्ण केले आहे. आज सत्ता ज्यांची आहे त्यांनी या कामात कोणतेही योगदान दिले नाही. नवीन लोकप्रतिनिधीला अजून गावे सुद्धा माहिती नाही. त्यामुळे पाणी देणारे थोरातांच्या प्रति आम्ही कृतज्ञ असल्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीराम मुंगसे म्हणाले.
वितरिकांचे काम तातडीने सुरू करा..
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वितरिकांच्या कामाचे नियोजन केले होते. यासाठी सर्व मंजुर्या पूर्ण केल्या आहेत. कालव्यांच्या खालच्या भागाला जसे पाणी मिळत आहे तसेच पाणी वर देण्यासाठी त्यांनी नियोजित आराखडा तयार केला आहे. हा आराखडा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंजूर केला असून डाव्या व उजव्या कालव्यावरील सर्व वितरिकांचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी सचिन दिघे यांनी केली आहे.