अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तालुक्यातील निंबळक शिवारातील दत्तमंदिर चौक परिसरात असलेल्या काळुबाई मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून मोबाईल, रोकडसह सुमारे 15 लाख 54 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नानासाहेब शिवाजी कोतकर (वय 41) यांनी शनिवारी (10 जानेवारी) रात्री फिर्याद दिली आहे. सदरची घटना शुक्रवारी (9 जानेवारी) रात्री आठ ते शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली आहे. कोतकर यांचे निंबळक गावात दत्तमंदिर चौक परिसरात काळुबाई मोबाईल शॉपी अँण्ड इलेक्ट्रॉनिक नावाचे दुकान आहे. दिवसभरातील काम संपल्यानंतर त्यांनी शुक्रवारी रात्री आठ वाजता दुकान बंद केले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरची कुलूप लावण्याची पट्टी तोडून दुकानात प्रवेश केला.
सामानाची उचकापाचक करून दुकानातील सुमारे 12 लाख रूपये किमतीचे 65 नग अँड्रॉईड मोबाईल, सुमारे 94 हजार रूपये किमतीचे 90 की-पॅड मोबाईल, दोन लाख 50 हजार रूपये रोख रक्कम तसेच 10 हजार रूपये किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेर्याचा डीव्हीआर असा एकूण 15 लाख 54 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. दरम्यान, दुसर्या दिवशी शनिवारी सकाळी नऊ वाजता कोतकर हे दुकानात आले असता त्यांना चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) शिरीष वमने, सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह भेट दिली. गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. भरचौकात दुकान फोडून 15 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याने गावात खळबळ उडाली आहे.




