श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील निमगाव खलू शिवारातील शेतघरात 5 ते 6 अज्ञात चोरट्यांनी घुसून वृद्ध दाम्पत्यावर घातक हत्यारांनी हल्ला केला. यात मंगलबाई शिवाजी भोईटे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती शिवाजी परशुराम भोईटे गंभीर जखमी झाले. चोरट्यांनी सुमारे 6 लाख 45 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना 5 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.
फिर्यादी महेंद्र शिवाजी भोईटे यांना त्यांचे बंधू सुनिल भोईटे यांनी घर बंद असल्याची माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. दरवाजा उघडल्यानंतर शिवाजी भोईटे रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत आढळले. त्यांच्या माहितीनुसार, रात्री घरात घुसलेल्या चोरट्यांनी दाम्पत्यावर हल्ला करून कपाटांची उचकापाचक केली आणि दागिने व रोकड घेऊन पलायन केले. लंपास केलेल्या ऐवजात सुमारे तीन तोळ्यांचे सोन्याचे मणी मंगळसूत्र (1 लाख 50 हजार रुपये), सहा तोळ्यांची मोहनमाळ (3 लाख रुपये), अडीच तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या (1 लाख 25 हजार रुपये) आणि 70 हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे.
जखमी दाम्पत्याला ग्रामीण रुग्णालय, श्रीगोंदा येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी मंगलबाई भोईटे यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. शिवाजी भोईटे यांना पुढील उपचारासाठी दौंड येथील डॉ. पाटील यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महेंद्र भोईटे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात 5 ते 6 अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




