श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील निपाणी वडगाव येथील रमेश पवार यांच्या खून प्रकरणातील आरोपी अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सोपान राऊत याच्या अटकपूर्व जामिन अर्जावरील सुनावणी दरम्यान आज दोन्ही बाजुने युक्तिवाद झाला. सोमवार दि. 17 जुलै रोजी याबाबतचा निर्णय देण्यात येणार आहे.
निपाणी वडगाव येथील रमेश पवारची पत्नी सविता, अजय गायकवाड व प्रसाद भवार यांनी पवार याला दारू पाजून त्याचे अपहरण करुन निपाणी वडगाव येथील तळ्याजवळ घेऊन गेले. त्या ठिकाणी या तिघांनी गळा आवळून त्याचा खून केला. रमेश पवार याचा मृत्यू झोपेत झाला असल्याचा बहाणा करून त्याचा अंत्यविधी करण्यात येत असताना पोलिसांनी अंत्यविधी थांबवत त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यात पवार याचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला.
पोलीस तपासात मयत पवार याची पत्नी सविता हिच्या बोलण्यात विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी तिला अटक केली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अजय गायकवाड या दुसर्या आरोपीला अटक केली. तपासात या खुनामागे अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सोपान राऊन मास्टर माईंड असल्याचे समोर आले. त्याच्या सांगण्यावरुन रमेश पवार याचा खून केल्याची कबुली सविता पवार व अजय गायकवाड यांनी दिली. त्यावरून या गुन्ह्यात राऊत यास आरोपी करण्यात आले.
श्री. राऊत याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी न्यायाधीश श्री. यादव यांच्यासमोर काल सुनावणी झाली. यावेळी आरोपीच्यावतीने तसेच सरकार पक्षाच्यावतीने युक्तिवाद झाला.
सुनावणीदरम्यान राऊत याच्या वकीलांनी, या गुन्ह्याशी सोपान राऊत याचा काहीही संबंध नाही. संशयावरून त्यास आरोपी करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात ठोस पुरावा नसल्याचा युक्तिवाद केला. तर सरकार पक्षातर्फे या घटनेत संबंधितांचे जबाब नोंदविण्यात आले असून पुरावेही मिळाले आहेत. पोलिसांनी तपासाची कागदपत्रे न्यायालयास दिली आहेत, असा युक्तीवाद करण्यात आला.
याप्रकरणी सोमवार दि. 17 जुलै रोजी सुनावणी ठेवण्यात आली असून या दिवशी जामीन अर्जावर निर्णय होणार आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. प्रसन्न गटणे यांनी तर राऊत यांच्यावतीने पुणे येथील नामवंत अॅड. हर्षद निंबाळकर हे काम पहात आहेत.