Friday, October 23, 2026
HomeनगरRahata : हप्त्याची ‘एन्ट्री’ अन् सुरक्षेची ‘वाट’; 300 रुपयांसाठी शिर्डीत साईभक्तांच्या जीवाशी...

Rahata : हप्त्याची ‘एन्ट्री’ अन् सुरक्षेची ‘वाट’; 300 रुपयांसाठी शिर्डीत साईभक्तांच्या जीवाशी खेळ

मद्यधुंद अवजड वाहन चालकाचा शिर्डीत धुमाकूळ || पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

राहाता |प्रतिनिधी| Rahata

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी शहरात 300 रुपयांच्या ‘चिरीमिरी’साठी कायदा आणि नागरिकांचा जीव कसा वार्‍यावर सोडला जातो, याचा एक धक्कादायक अन् तितकाच संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. निर्मळ पिंपरी बायपासचा नियम धाब्यावर बसवून मद्यधुंद अवस्थेतील एका अवजड वाहन चालकाने थेट शहरात प्रवेश करत तुफान धुमाकूळ घातला. निर्मळ पिंपरी नाक्यावर 300 रुपये देऊन आलोय! अशा उर्मट भाषेत चालकाने दिलेल्या कबुलीमुळे वाहतूक पोलीस आणि नाक्यावरील वसुली बहाद्दरांचा खरा चेहरा उघडा पडला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 18 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास निर्मळ पिंपरी येथील मुख्य बायपास ओलांडून एका अवजड वाहनाने थेट शहराच्या दिशेने कूच केले. शिर्डी बसस्थानकासमोरील अवजड वाहनांना अटकाव करण्यासाठी उभारलेले हाय-गेट या चालकाने अतिशय चलाखीने चकवले. त्यानंतर पाण्याच्या टाकी चौकातून हे वाहन अत्यंत वेगाने आणि राँग साईडने धावू लागले. या बेदरकार चालकाने रस्त्यावरून जाणार्‍या एका स्थानिकाच्या चारचाकी वाहनाला जोरदार कट मारला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा भीषण अपघात टळला. संतप्त स्थानिकांनी तात्काळ त्या वाहनाला अडवून मद्यधुंद चालकाला जाब विचारला असता, आम्ही 300 रुपयांची एन्ट्री देऊन आलोय, आम्हाला कोण अडवणार? असा तोरा त्याने दाखवला.

शिर्डी हे जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ असल्याने या ठिकाणी 24 तास कडक पोलीस बंदोबस्त असतो. शिर्डीतील रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी निर्मळ पिंपरी बायपास उभारण्यात आला आहे. मात्र पोलिसांचे कथित अर्थपूर्ण दुर्लक्ष आणि नाक्यावरील चिरीमिरीमुळे शहरात अवजड वाहनांना मोकळे रान मिळाले आहे. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे, राँग साईडने फिरवणे आणि शहरात बेकायदेशीर प्रवेश करणे हा अत्यंत गंभीर आणि गंभीर गुन्ह्याचा प्रकार आहे. काल रात्री एखादा भाविक किंवा दुचाकीस्वार या वाहनाखाली आला असता, तर या संभाव्य जीवितहानीला जबाबदार कोण? असा रोखठोक सवाल आता विचारला जात आहे.

या धक्कादायक प्रकारामुळे शिर्डीतील नागरिक, पत्रकार आणि साईभक्तांमध्ये कमालीचा संताप पाहायला मिळत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी याप्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करावा, निर्मळ पिंपरी नाक्यावर काल रात्री कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि त्या मद्यधुंद चालकावर कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

हप्तेबाजी थांबवा, अन्यथा रास्ता रोको!
केवळ कागदावर नियम दाखवून प्रत्यक्ष रस्त्यावर हप्तेबाजी चालणार असेल तर साईभक्तांचे रक्षण कसे होणार? पोलिसांनी तातडीने या बेकायदेशीर वाहतुकीला आणि वसुलीला आळा घातला नाही तर शिर्डीकर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील!
– सचिन कोते, शिवसेना जिल्हाध्यक्ष उबाठा

ताज्या बातम्या

रील स्टार निघाले लुटारू! ९ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि दुचाकी...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर...