श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळपिंपरी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या गंभीर आणि समाजघातक रॅकेटवर पोलिसांनी मोठा घाव घालत, श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टर रवींद्र कुटेसह दोन एजंटांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर आणि लोणी पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत या प्रकरणाचा विस्तार उघडकीस आला आहे.
श्रीरामपूर शहरातील डॉ. रवींद्र कुटे सह प्रदीप भाऊसाहेब ढगे (रा.कोर्हाळे), निलेश ज्ञानेश्वर भवर (नपावाडी) असे याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 29 एप्रिल 2026 रोजी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारातील निळवंडे कालव्यालगत असलेल्या एका खोलीत गर्भवती महिलांकडून तब्बल 10 हजार रुपये घेऊन बेकायदा गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचे समोर आले होते. या माहितीची खातरजमा करत पोलीस पथकाने वैद्यकीय अधिकार्यांसह आणि पीसीपीएनडीटी प्राधिकरणाच्या उपस्थितीत सापळा रचून छापा टाकला. या छाप्यात डॉ. राहुल भणगे, रा. भानसहिवरे, ता. नेवासा आणि अभिजीत भुसाळ यांना रंगेहात पकडण्यात आले. घटनास्थळावरून अल्ट्रासोनोग्राफी मशीन, मोबाईल फोन, रोख रक्कम, विविध साहित्य आणि तीन चारचाकी वाहने असा तब्बल 24 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, तपासाच्या पुढील टप्प्यात तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे या रॅकेटमध्ये दलाल म्हणून काम करणारे प्रदीप भाऊसाहेब ढगे (रा. कोर्हाळे) आणि निलेश ज्ञानेश्वर भवर (वय 42, नापावाडी) यांचा सहभाग उघड झाला. पोलिसांनी दोघांनाही शिताफीने अटक केली. विशेष म्हणजे, आरोपींच्या चौकशीतून श्रीरामपूर येथील डॉ. रविंद्र कुटे यांचाही या गैरप्रकारात सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रातील काही घटकांकडून होत असलेल्या गंभीर गैरप्रकारांचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. गर्भलिंग निदानासारख्या कायद्याने बंदी असलेल्या आणि समाजात लिंगभेद वाढवणार्या कृत्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये आणखी काही डॉक्टर आणि एजंटांचा सहभाग असण्याची दाट शक्यता असून, तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. लोणी पोलीस स्टेशनमार्फत पुढील तपास सुरू आहे. या धडक कारवाईत पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि लोणी पोलीस स्टेशनच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. समाजातील कन्या भ्रूणहत्येस कारणीभूत ठरणार्या अशा रॅकेट्स विरोधात ही कारवाई एक कठोर इशारा मानली जात आहे.
पुण्यातील अन्य काही डॉक्टर, एजंट यामध्ये सामील असण्याची शक्यता आहे. त्याबाबतही बारकाईने तपास सुरु आहे. यातील एजंट प्रदीप ढगे याच्याकडे लिंग निदान चाचणी करणारे आणखी एक मशीन मिळून आले असून, ते देखील जप्त करण्यात आले आहेत. लिंगनिदान चाचणी करणारे डॉक्टर, एजंट, दलाल यांच्यावर त्याचप्रमाणे संबंधित महिलेच्या कुटुंबियांवर एवढ्या मोठ्या संख्येने अटक करून केलेली ही पहिलीच कारवाई मानली जात आहे.
– सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधिक्षक





