नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राविरोधात गरळ ओकली आहे. संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राचे योगदान काय, असा सवाल निशिकांत दुबे यांनी विचारला आहे. मराठी लोक आमच्याच पैशांवर जगतात असे वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्राकडे ना खाणी आहेत ना उद्योगधंदे असेही निशिकांत दुबेंनी म्हटले आहे. निशिकांत दुबे यांनी एका वृत्तसंस्थेची बोलताना महाराष्ट्राबाबत गरळ ओकली आहे.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरेंविरोधात दंड थोपटताना महाराष्ट्र कोणाच्या भाकरी खातो, असा विधान केले. “आपल्या घरात कुत्राही वाघ असतो. महाराष्ट्राबाहेर चला. तुम्ही जर बॉस आहात, तर बिहारला चला. उत्तर प्रदेशला चला, तामिळनाडूला चला. तुम्हाला आपटून आपटून मारू”, असे खासदार निशिकांत दुबे म्हणाले.
महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो
महाराष्ट्र कोणाच्या पैशांची भाकरी खातो. तिकडे टाटा, बिर्ला आणि रिलायन्स असेल. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसते तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केले असते? टाटा , बिर्ला आणि रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात पण टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता. तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खनिजाच्या खाणी नाहीत. सगळ्या खाणी झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि ओडिसात आहेत. रिलायन्सची रिफायनरी आणि सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रात काय आहे? मग वरुन आमचे शोषण करुन दादागिरी करता, अशी गरळ निशिकांत दुबे यांनी ओकली.
…तर उर्दू भाषिकांनाही मारा
“तुम्ही हुकुमशाही करत आहात. वर आमचे शोषण करून कर भरता. जर तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही हिंदी भाषिकांना मारत आहात, तर उर्दू भाषिकांनाही मारा. तामिळी लोकांना मारा. तुम्ही जी ही नीच कृत्य करत आहात. मी म्हटले आहे की, तुम्ही जर बॉस आहात, तर चला बिहारला. चला उत्तर प्रदेशला. तामिळनाडूला चला. तुम्हाला आपटून आपटून मारू. ही अराजकता चालणार नाही”, असे आव्हान भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी दिले.
मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांची आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय युतीच्या दिशेने पावले पडण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने आता ठाकरे बंधूंवर प्रतिहल्ला करायला सुरुवात केली आहे. यासाठी भाजपने स्थानिक नेत्यांसोबत उत्तरेतील खासदारांना कामाला लावल्याचे दिसत आहे. कारण भाजपचे उत्तर भारतातील खासदार सध्या ठाकरे बंधूंवर अत्यंत आक्रमक आणि विखारी भाषेत टीका करु लागले आहेत. निशिकांत दुबे यांनी गेल्या २४ तासांमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
“आम्ही मराठीचा सन्मान करतो. मराठी आदरणीय भाषा आहे. आम्ही छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपेंपासून सर्व पेशव्यांचा सन्मान करतो. लोकमान्य टिळक असो, लजपतराय, गोपाळकृष्ण गोखले सगळ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले आहे. आम्ही सर्व मराठी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करतो”, असे निशिकांत दुबे म्हणाले.
तर मी मान्य करेन उद्धव आणि राज बाळासाहेबांचे वारसदार आहेत
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सध्या जे काही करत आहेत, त्यापेक्षा खालच्या दर्जाचे काहाही नसू शकते. आम्ही याचा प्रतिकार करणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माहीमच्या दर्ग्यासमोर जाऊन हिंदी किंवा उर्दू भाषिकाला मारुन दाखवावे. तरच मी मान्य करेन की, उद्धव आणि राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत, अशी टीका निशिकांत दुबे यांनी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




