Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊत, दानवेंच्या अडचणी वाढणार? नीतेश राणेंची थेट विधिमंडळ सचिवांकडे तक्रार

संजय राऊत, दानवेंच्या अडचणी वाढणार? नीतेश राणेंची थेट विधिमंडळ सचिवांकडे तक्रार

मुंबई | Mumbai

आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Case) भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) आणि अंबादास दानवेंवर (Ambadas Danve) गंभीर आरोप केले आहेत. राऊत आणि दानवे सातत्याने वक्तव्य करत विधानसभा अध्यक्षांवर जाणीवपूर्वक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा नितेश यांनी केला आहे. या दोन्ही नेत्यांवर विशेषधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी नितेश यांनी विधीमंडळ सचिवांना पत्र लिहून केली आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्यावर्षी जूनमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर या सत्तासंघर्षाची सुनावणी सुर्वोच्च न्यायालयात झाली. यावर्षी 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असे सांगितले होते. याबाबत आपल्या बाजूने निकाल लागेल, अशी आशा ठाकरे गटाला आहे. मात्र, चार महिने झाले तरी, याप्रकरणी निर्णय न झाल्याने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचा वेळकाढूपणा सुरू असल्याचा सूर ठाकरे गटाचा आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत तसेच आमदार अंबादास दानवे यांनी थेट राहुल नार्वेकर यांच्यावर ठपका ठेवला आहे. त्याचा संदर्भ देत भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळ सचिवांना पत्र लिहून संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्याविरोधात हक्कभंगाची सूचना दिली आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर सद्या पक्षांतरबंदीविषयी एका प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणामध्ये या दोन्ही नेत्यांचे राजकीय हितसंबध आहेत. स्फोटक भाष्य करून अध्यक्षांवर एक प्रकारे दबाव टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत, यामुळे लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्याच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांच्या बोलण्यावर तत्काळ बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे. संजय राऊत व अंबादास दानवे यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यासाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे तत्काळ सुपूर्द करावे व यावर विनाविलंब निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नितेश राणे यांचं पत्र जसंच्या तसं

प्रति,

मा. सचिव,

महाराष्‍ट्र विधानमंडळ सचिवालय,

विधान भवन, नरीमन पॉइंट,

मुंबई.

विषय: म.वि.स. नियम 274 अन्‍वये सर्वश्री संजय राऊत व अंबादास दानवे

यांच्‍याविरुध्‍द विशेषाधिकार भंगाची सूचना.

महोदय,

श्री. संजय राऊत, राज्यसभा सदस्‍य, यांनी नजिकच्‍या काळात मा. विधानसभा अध्‍यक्ष यांच्‍या संदर्भात पुढील वक्‍तव्‍ये केली.

1. ‘’संविधान, कायदा व विधीमंडळाशी बेईमानी करुन वेळकाढूपणा चाललाय. घटनात्‍मक

पदावर बसलेले विधानसभा अध्‍यक्ष घटनाबाह्य सरकारला चालवित आहेत काय?’’

2. ‘’आम्‍ही करु ते खरं अशी बादशाही विधानसभा अध्‍यक्ष करीत असतील तर ती

बादशाही बुडाल्‍याशिवाय रहाणार नाही.’’

3. ‘’विधानसभा अध्‍यक्ष फुटले आहेत.’’

श्री. अंबादास दानवे, वि.प.स., विरोधीपक्ष नेता, विधान परिषद यांनी मा. विधानसभा

अध्‍यक्षांच्‍या संदर्भात पुढील प्रमाणे वक्‍तव्‍य केले. ‘’उशीरा न्‍याय देणे हा सुध्‍दा अन्‍याय असतो आणि तो अन्‍याय विधानसभा अध्‍यक्ष करीत आहेत.’’

मा. अध्‍यक्ष, विधानसभा यांच्‍यासमोर सध्‍या पक्षांतरबंदी विषयी एका प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या प्रकरणामध्‍ये उपरोक्‍त दोन्‍ही व्‍यक्‍तींचे राजकीय हितसंबंध आहेत. या पार्श्‍वभूमीवर वर नमूद वक्‍तव्‍ये करुन त्‍यांनी मा. विधानसभा अध्‍यक्षांवर अनुचित दबाव व प्रभाव टाकण्‍याची कृती केली असून त्‍याद्वारे मा. विधानसभा अध्‍यक्षांचा व पर्यायाने विधानसभेचा अधिक्षेप केला आहे.यांचे अशा प्रकारचे स्फोटक भाष्य केल्यामुळे अध्यक्षांवर एक प्रकारे दबाव टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे, यामुळे लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्या बोलण्यावर तात्काळ बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे व त्या अनुसार कारवाई करावी अशी मागणी करतो.

वर नमूद वस्‍तुस्थिती पहाता सर्वश्री संजय राऊत व अंबादास दानवे यांच्‍या विरुध्‍द योग्‍य ती कारवाई करण्‍यासाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे तात्‍काळ सुपूर्द करावे व ह्यावर विनाविलंब निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात यावे , ही विनंती.

आपला,

(नीतेश नारायणराव राणे) वि.स.स.

श्रीरामपूर दरोडा प्रकरणी खळबळजनक खुलासा! दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीनेच आवळला पतीचा गळा

- Advertisment -

ताज्या बातम्या