मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पक्षांतराच्या चर्चा आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काही नव्या नाहीत, मात्र MPSC विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि पेपरफुटीच्या गंभीर मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार ‘शब्दयुद्ध’ पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या पक्षांतराबाबत केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या दाव्यावर आता नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमकपणे उत्तर देत रोहित पवारांचे आव्हान थेट स्वीकारले आहे.
MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या रोहित पवारांचे कौतुक करत नितेश राणेंनी त्यांना भविष्यात मंत्रिमंडळात एकत्र काम करण्याची शक्यता वर्तवली होती. त्यावर रोहित पवारांनी, “नितीश भाऊ भाजप सोडतील, आमच्यासोबत आले तर ‘वेलकम ब्रो'” असा टोला लगावला होता. यावर पलटवार करताना नितेश राणे म्हणाले, “माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी भाजपमध्येच आहे आणि माझी राजकीय भूमिका अगदी स्पष्ट आहे. इकडे-तिकडेची भाषा करून वेळ मारून नेण्यापेक्षा रोहित पवारांना जर मी भाजप सोडण्याची नेमकी वेळ आणि तारीख माहिती असेल, तर त्यांनी ती थेट जाहीर करून टाकावी. भारतीय जनता पक्षाला अशा पोकळ धमक्यांनी काहीही फरक पडत नाही.”
नितेश राणे यांनी रोहित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पुढे सांगितले की, “उगाच माझ्याबद्दल अंदाज बांधण्यापेक्षा सत्तेत आल्यावर आणि मंत्री झाल्यावर संबंधित अध्यक्षांना हटवण्यासाठी काय कायदेशीर प्रक्रिया करावी लागते, हे आधी समजून घेतले पाहिजे. प्रशासकीय प्रक्रियेचा अभ्यास असला की MPSC च्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने मदत कशी करता येईल आणि त्यांना कसा न्याय मिळवून देता येईल, हे स्पष्टपणे समजेल.”
दुसरीकडे, सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शैलेंद्र देवळाणकर यांच्यावर पेपर फोडून हजार-दीड हजार कोटी रुपये कमावल्याचा गंभीर आरोप केला होता. या विषयावर भाष्य करताना नितेश राणे यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “हा विषय हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट जोडलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रश्नाकडे कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून न पाहता केवळ विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने पाहिले पाहिजे,” असे ते म्हणाले.
राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक ती पावले उचलली असल्याचे सांगत राणे यांनी स्पष्ट केले की, संबंधित सचिवांची तात्काळ बदली करण्यात आली असून व्ही. राधा मॅडम आणि रामस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली एक सक्षम समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सध्या MPSC च्या संपूर्ण प्रक्रियेचा आणि समस्यांचा सखोल अभ्यास करत असून लवकरच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.




