नागपूर | Nagpur
गेल्या दहा वर्षात नागपूरात एक लाख कोटी पेक्षा जास्त निधीचे विकास कामे झाले. यात चांगले रस्ते झाले, ७० टक्के नागपुरकरांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळते आहे. आम्ही मिहानमध्ये ७८ हजार स्थानिक तरुणांना नोकरी दिली आहे. जे देशात, जगात कुठे नाही, असे अनेक प्रकल्प एकट्या नागपुरात बघायला आज मिळत आहे. राज्यातील इतर नेत्यांना त्यांच्या मुलांची चिंता आहे. पण आम्हाला नागपूरच्या गरीब तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, याची चिंता आहे, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते नागपुरातील भाजपच्या शक्तिप्रदर्शन रॅलीत बोलत होते.
जे देशात, जगात कुठे नाही, असे अनेक प्रकल्प एकट्या नागपुरात बघायला आज मिळत आहे. गेल्या ६०-७० वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते महायुतीने दहा वर्षात केले आहे. ही सर्व विकासकामे माझ्यामुळे, देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे अथवा अन्य कोणामुळे नाही. तर तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे झाले आहे. आजवर जेवढा विकास तुम्ही पाहिला तो फक्त ट्रेलर होता, असली पिक्चर तो अभी बाकी है! त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारांना,देवेंद्र फडणवीसांना संधी द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नितीन गडकरींनी केलेय.
काय म्हणाले नितीन गडकरी?
नितीन गडकरी आज देवेंद्र फडणवीसांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी नागपूरमधील जनतेला सबोधित केले. “भाजपाने नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. जर नागपूरच्या जनतेने आम्हाला ताकद दिली नसती, तर आम्ही नागपूरचं चित्र बदलू शकलो नसतो. आतापर्यंत तुम्ही जो विकास बघितला, तो केवळ ट्रेलर होता. इथून पुढे तुम्हाला खरा सिनेमा बघायला मिळेल. पुन्हा नागपूरच्या जनतेने भाजपाला आशीर्वाद दिला, तर दुप्पट वेगाने विकासकामे होतील. आम्हाला नागपूरला देशातील सर्वात सुंदर, स्वच्छ आणि प्रदुषणमुक्त शहर बनवायचे आहे”, असे नितीन गडकरी म्हणाले.
दुसऱ्या पक्षातील नेत्यांना मुलाबाळाची चिंता
दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या मुलाबाळांना उमेदवारी देण्याची चिंता आहे. मात्र आम्हाला नागपूर आणि राज्याच्या विकासाची, गोरगरीबांच्या मुलांची काळजी आहे. तरुणांना आम्ही नोकरी मिळवून देत आहोत. प्रगतीच्या दिशेने देशाला पुढे नेत आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तेची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्या, देवेंद्र फडणवीस बावनकुळे सारखे लोक सत्तेत गेले, तर ते पुन्हा चांगले काम करून दाखवतील, असा विश्वासही नितीन गडकरींनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय.
विरोधकांबाबत जास्त बोलणार नाही-देवेंद्र फडणवीस
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना विरोधकांना लक्ष्य केले. “मी विरोधकांबाबत जास्त काही बोलणार नाही. विरोधकांचा पराभव करण्यासाठी लाडक्या बहिणी पुरेशा आहेत. ज्या लाडक्या बहिणीच्या तोंडचा घास पळवण्याकरिता सुनील केदार, नाना पटोलेंसारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी नागपूरच्या न्यायालयात याचिका दाखल केली. त्या लाडक्या बहिणीच त्यांना पुरून उरतील”, अशी टीका त्यांनी केली. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या निवडणुकीत नागपूर दक्षिण पश्चिममधून विजयाचा विश्वासही व्यक्त केला. “या निवडणुकीत सहाव्यांदा मला दक्षिण पश्चिमची जनता मला आशीर्वाद देणार आहे”, असे ते म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा