सार्वमत
नवी दिल्ली – पुढील पाच वर्षांमध्ये पाच कोटी नोकर्यांचं उद्दिष्ट्य ठेवण्यात आले असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
एमएसएमईचं अर्थव्यवस्थेत मोठं योगदान आहे. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे या क्षेत्रावर संकट आलं आहे. केंद्र सरकारनं सर्व क्षेत्रांना उभारी देण्यासाठी 20 लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. यापैकी तीन लाख कोटी रूपयांचा फायदा एमएसएमई क्षेत्राला होणार आहे असेही ते म्हणाले. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
करोनामुळे नक्कीच एमएसएमई क्षेत्रासोबतच संपूर्ण उद्योग क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु याची एक सकारात्मक बाजू आहे, असंही गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी पीपीई किट्सवरही भाष्य केलं. दोन महिन्यांपूर्वी आपण पीपीई किट्सचं उत्पादन करत नव्हतो. आपण चीनमधून पीपीई किट्स मागवले होते. परंतु आता देशात एका दिवसांत 3 लाख पीपीई किट्सचं उत्पादन करण्यात येत आहे. आता पीपीई किट्सच्या निर्यातीचा विचार सुरू आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
स्वदेशीला आत्मनिर्भर भारताशी जोडता येणार नाही. भारत आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही आता आयात कमी करणार आहोत. तसंच निर्यातीला अधिक प्रोत्साहन देणार आहोत. करोना संकटाच्या काळात कोणीही निराश होऊ नये. सकारात्म विचारांना आपल्याला पुढे न्यायला हवं. विरोधी पक्षानंही स्थलांतरीत मजुरांवरून राजकारण करू नये, असंही गडकरी म्हणाले.