Friday, May 3, 2024
Homeराजकीयनितीश कुमार यांनी सातव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

नितीश कुमार यांनी सातव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

पाटणा | Patana

आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची नितीश कुमार यांनी शपथ घेतली. त्याचबरोबर ते सलग चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. राज्यपाल फागू चौहान यांनी पाटण्यातील राजभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात त्यांना शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपचे बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला उपस्थित होते. नितीशकुमार यांच्यासोबत भाजपाचे नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

- Advertisement -

नितीश कुमार यांचं मंत्रिमंडळ

जेडीयूच्या वतीने विजय चौधरी, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, मेवालाल चौधरी, शीला कुमारी यांनी शपथ घेतली. शीला कुमारी या पहिल्यांदाच मंत्री झाल्या आहेत. हिंदुस्तानी आवाम मोर्चाच्या वतीने संतोष सुमन तर विकासशील इंसान पार्टीच्या वतीने मुकेश सहानी यांनी शपथ घेतली. तर भाजपच्या वतीने तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांच्याशिवाय मंगल पांडेय, अमरेंद्र प्रताप, रामप्रीत पासवान, जीवेश कुमार, रामसूरत राय यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

या निवडणुकीत NDAला 125 जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजप 73, जेडीयू 43, हिंदुस्तान आवाम मोर्चा आणि विकास इंसाफ पार्टीला प्रत्येकी 4 जागा मिळाल्या आहेत. या पक्षांना त्यांना मिळालेल्या जागांप्रमाणे मंत्रिपदं देण्यात आली आहेत. RJD आणि काँग्रेससह महाआघाडीने या शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.

भाजपच्या वाटाघाटीमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रातल्या जागा वाटपापासून ते सत्तेतल्या वाटणीपर्यंत सगळा अनुभव पाठीशी असल्याने पक्षनेतृत्वाने फडणवीसांना ही मोठी जबाबदारी दिली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या