Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधनियम बदल लज्जत वाढवणार ?

नियम बदल लज्जत वाढवणार ?

कोणत्याही खेळामध्ये काळानुरूप बदल होत असतात. खेळाच्या बदलत्या स्वरुपानुसार नियमांमध्ये बदल होणे स्वाभाविक आहे. क्रिकेटने आजवर बरेच बदल अनुभवले आहेत. मध्यंतरी मेलबर्न क्रिकेट क्बलने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले. त्यानिमित्ताने…

खेळ कोणताही असला तरी त्यात काळानुरूप बदल होत असतात. नव्या तंत्रज्ञानामुळे खेळ अधिक सुलभ पद्धतीने खेळला जातो. तंत्रज्ञानाच्या समावेशामुळे मानवी चुकांचे प्रमाण कमी होते आणि वाद उद्भवत नाही. क्रिकेटची सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत हा खेळ अनेक बदलांमधून गेला आहे. पूर्वी फक्त कसोटी क्रिकेट होते. पाच दिवसांचे क्रिकेट अधिक रंजक करण्यासाठी एकदिवसीय सामन्यांचा घाट घातला गेला. क्रिकेटचे छोटे रूप चांगलेच लोकप्रिय झाले, सुरुवातीला एकदिवसीय क्रिकेट 60 षटकांचे होते. कालांतराने दहा षटके कमी करून 50 षटकांचे करण्यात आले. 50 षटकांचे सामने पाहण्यास प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली. क्रिकेटमध्ये चौकार, षटकारांची बरसात होऊ लागली. एकदिवसीय क्रिकेट गाजल्यानंतर टी-20 हा नवा प्रकार लोकांसमोर आला. टी-20 सामन्यांनी लोकांवर चांगलेच गारूड केले. त्यातच टी-20 चा पहिला विश्वचषक भारतीय संघाने जिंकल्यानंतर तर या प्रकाराला सोन्याचे दिवस आले. मग आयपीएल सुरू झाले. क्रिकेटमध्ये पैसा आला. तंत्रज्ञानामुळे निर्णयांमध्ये अचूकता आली. मैदानावरील पंचाने बाद दिल्यानंतरही तिसर्‍या पंचांकडे दाद मागण्याची मुभा मिळू लागली.

यामुळे फलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण करणार्‍या संघांना समसमान संधी मिळू लागली. तंत्रज्ञानामुळे सगळे सर्वांसमोर येत असल्यामुळे पक्षपात होण्याची शक्यताही खूप कमी झाली. या सगळ्याचा फायदा सरतेशेवटी क्रिकेटला झाला. दरम्यानच्या काळात नियमांमध्येही बरेच बदल करण्यात आले. टी-20 क्रिकेटमुळे अनेक नियमांना फाटा देण्यात आला. सुपर ओव्हर सुरू झाली. नो बॉल असल्यास फलंदाजाला फ्री हिट मिळू लागली. यामुळे क्रिकेट अधिक रंजक झाले. आयपीएलमुळे क्रिकेटमध्ये मनोरंजन आले. या सगळ्यामुळे क्रिकेटमध्ये अजून काही बदल करावेत, याची जाणीव होऊ लागली. मग नियम बदलण्याचे अधिकार असणार्‍या मेलबर्न क्रिकेट क्लबने खेळातल्या नियमांमध्ये बदल केले. हे बदल यंदा ऑक्टोबर महिन्यापासून लागू केले जाणार आहेत. म्हणजेच ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 विश्वचषकापासून या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

- Advertisement -

सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास त्या जागी बदली खेळाडू येतो. मात्र या खेळाडूचा आधीच्या खेळाडूने केलेल्या कामगिरीशी काहीही संबंध नसतो. मात्र आता असे होणार नाही. कारण एखाद्या खेळाडूने बदली होण्याआधी बळी घेतला असेल तर तो बळी त्याच्या जागी येणार्‍या नव्या खेळाडूच्या नावावर जोडला जाईल. क्रिकेटमधल्या 18.11 नियमानुसार बाद होण्याआधी फलंदाजांनी जागा बदलल्या असतील, म्हणजेच एक धाव घेऊन बाद झालेला खेळाडू दुसर्‍या बाजूला गेला असेल तर नवा खेळाडू स्ट्राईक घेत नाही. तो नॉन स्ट्रायकर एंडलाच उभा राहतो. मात्र यापुढे असे होणार नाही. झेलबाद झाल्यानंतर फलंदाजाने जागा बदलली असली तरी त्याच्या जागी येणारा नवा फलंदाज स्ट्राईक घेईल. षटक संपल्याच्या अपवादात्मक परिस्थितीत नवा फलंदाज गोलंदाजाच्या दिशेला उभा राहील. या नियमामुळे आता कोणत्याही फलंदाजाला चलाखीने तळाच्या फलंदाजांना स्ट्राईक घेण्यापासून दूर ठेवता येणार नाही.

डेड बॉलशी संबंधित नियमही बदलण्यात आला आहे. सामन्यादरम्यान मैदानात आलेल्या प्रेक्षकांमुळे, पक्ष्यांमुळे किंवा प्राण्यांमुळे अडथळे निर्माण होतात. काही वेळा फलंदाजाने मारलेला चौकार अडतो तर काहीवेळा क्षेत्ररक्षकाला झेल घेता येत नाही. परिणामी एखाद्या संघाला लाभ होऊ शकतो. म्हणूनच आता अशा परिस्थितीत पंच संबंधित चेंडू डेड बॉल असल्याचे जाहीर करू शकतील. तसेच गोलंदाजाने गोलंदाजी करण्याआधी धावबाद करण्यासाठी स्ट्राईकवर असणार्‍या फलंदाजाच्या दिशेने चेंडू फेकला तर यापुढे तो डेड बॉल गणला जाईल. याआधी हा ‘नो बॉल’ दिला जात असे.

वाईड बॉलसंदर्भातल्या नियामंमध्येही बदल करण्यात आला आहे. फलंदाज वाईड बॉलशी संबंधित नियमांचा गैरफायदा घेत असत. गोलंदाज चेंडू टाकत असताना फलंदाजाने केलेल्या हालचालींमुळे तसेच बदललेल्या स्टान्समुळे गोंधळ होऊन गोलंदाजाची चेंडूफेक भरकटत असे. याचा लाभ फलंदाज उचलत असत. पण यापुढे असे होणार नाही. कारण आता गोलंदाजाने रनअपला सुरुवात करण्यापूर्वी फलंदाज जिथे उभा असेल ती जागा ग्राह्य धरली जाईल आणि त्यानुसार वाईड बॉलचा निर्णय दिला जाईल.

याआधी चेंडू टाकल्यानंतर फलंदाज उभा असणार्‍या स्थानाचा विचार केला जात असे. मात्र यामुळे फलंदाजी करणार्‍या संघाला लाभ होत असल्याचे बघून संबंधित नियम बदलण्यात आला आहे. खेळामध्ये अनाहूतपणे का होईना, पाहायला मिळणरा पक्षपातीपणा कमी करण्याच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला आहे. मात्र फलंदाजाने रिव्हर्स स्कूप किंवा पूल शॉट खेळण्यासाठी अखेरच्या क्षणी स्टान्स बदलला तर पंच कशा पद्धतीने वाईड बॉल जाहीर करणार हे बघणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.

स्ट्राईकवर असणार्‍या फलंदाजाच्या चेंडू टोलावण्याच्या हक्कासंबंधीही काही नियम करण्यात आले आहेत. तुम्हाला 2021 च्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानच्या मोहम्मद हाफीजचा चेंडू सीमापार टोलावल्याचा क्षण आठवतोय का? हा चेंडू मोहम्मद हाफीजच्या हातातून सुटून दोन टप्पे पडून वॉर्नरपर्यंत पोहोचला होता.

वॉर्नरने याचा लाभ उचलला आणि चेंडू सीमापार टोलावला. पण यापुढे फलंदाजाला असे करता येणार नाही. कारण अशा पद्धतीच्या चेंडूवर फटका मारताना फलंदाजाच्या शरीराचा किंवा बॅटचा काही भाग खेळपट्टीच्या आत असायला हवा, असा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे फलंदाजाला खेळपट्टीच्या बाहेर जाऊन चेंडू खेळता येणार नाही. तसेच पंच असा बॉल ‘डेड बॉल’ असल्याचे जाहीर करू शकतात. तसेच गोलंदाजाने टाकलेल्या एखाद्या चेंडूवर फलंदाजाला खेळपट्टीच्या बाहेर येणे भाग पडले तर हा चेंडू ‘नो बॉल’ दिला जाऊ शकतो.

गोलंदाज चेंडू टाकत असताना क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातल्या खेळाडूंनी चुकीची हालचाल केली किंवा जागा बदलली तर प्रतिस्पर्धी संघाला पाच अतिरिक्त धावा दिल्या जातील. याआधी अशा परिस्थितीत संबंधित चेंडू ‘डेड बॉल’ दिला जात असे. आता मात्र फलंदाजी करणार्‍या संघाचा फायदा होईल आणि गोलंदाजी करणार्‍या संघाला दंड बसेल. गोलंदाजाने गोलंदाजी करण्यासाठी स्टान्स घेतल्यानंतर क्षेत्ररक्षकांनी आपल्या जागा घेतल्यानंतर आणि फलंदाजानेही क्षेत्ररक्षकांवर नजर फिरवल्यानंतर पुन्हा जागा बदलणे खेळभावनेशी सुसंगत नाही.

त्यामुळे अशा पद्धतीचा नवा नियम लागू करण्यात आला आहे. क्रिकेटमध्ये मांकडिंग हीसुद्धा फलंदाजाला बाद करण्याची एक पद्धत आहे. यात गोलंदाज वारंवार क्रिज सोडणार्‍या फलंदाजाला बाद करू शकतो. अर्थात, असा प्रकार अखिलाडूवृत्तीचा मानला जात असे. 2019 च्या आयपीएल स्पर्धेत आर. अश्विनने जॉस बटलरला अशा पद्धतीने बाद केले होते. यानंतर आर. अश्विनवर बरीच टीका करण्यात आली होती. मात्र आता मांकडिंग पद्धतीने बाद करणे ही अखिलाडूवृत्ती नाही तर अधिकृतपणे बाद करण्याची पद्धत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

करोनाकाळात क्रिकेटमधला चेंडू चमकवण्यासाठी लाळ किंवा थुंकी लावण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता अशा पद्धतीने चेंडू चमकावण्यावर कायमची बंदी घालण्यात आली आहे. अशा पद्धतीने चेंडूला लाळ लावल्यानंतर चेंडू अधिक चांगल्या प्रकारे स्विंग होऊ शकतो, असे मानले जायचे. मात्र मेलबर्न क्रिकेट क्लबने केलेल्या संशोधनानुसार लाळ लावल्याने चेंडू स्विंग होण्यावर फारसा परिणाम होत नाही, असे समोर आले.

त्यामुळे लाळ लावण्यावर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे चेंडू चमकवण्यासाठी घामाचा वापर करता येईल. तसेच यामुळे खेळाडू मैदानात च्युईंगमही चघळू शकणार नाही. अधिक प्रमाणात लाळ उत्पन्न होण्यासाठी खेळाडू च्युईंगम चघळत असत. मात्र आता त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. हे सर्व नियम ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहेत. या नियमांमुळे क्रिकेट कसे बदलणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या