मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थींकडून योजनेचे पैसे परत घेण्यावरुन सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील कुठल्याही अपात्र लाभार्थी महिलेकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतलेले नाहीत किंवा पैसे परत घेण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतला नसल्याचा खुलासा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला.
लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी विविध विभागांच्या मदतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ नाकारण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज केले आहेत. दरम्यान हे अर्ज करणाऱ्या महिलांचे पैसे राज्य सरकार परत घेणार की नाही, त्याविषयी ‘वेगवेगळ्या माध्यमांकडून समज गैरसमज पहायला मिळत आहेत. मात्र आतापर्यंत आम्ही एकाही महिलेचे पैसे माघारी घेतलेले नाहीत किंवा हे पैसे परत घेण्याविषयी कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
काही महिलांनी नोकरी, नवीन गाडीची खरेदी, परराज्यात स्थलांतर आदी कारणांनी योजनेसाठी अपात्र ठरत असल्याने पैसे माघारी करण्यासाठी स्वतःहून सरकारकडे अर्ज केले आहेत. दररोज पाच-सहा अर्ज जिल्हा पातळीवरून येत आहेत. पण आम्ही त्यांच्याशी संपर्क करून कुठलीही माहिती अजून मागवलेली नाही. एखाद्या अपात्र लाभार्थ्याला पैसे परत करायचे असतील तर नियोजन विभाग ते पैसे जमा करण्यासाठी एक खिडकी तयार करून देतील आणि तिथे पैसे जमा होतील. मात्र, विभाग कुणाचेही पैसे स्वतःहून परत घेणार नाही. ज्या महिला स्वतःहून पैसे परत करतील त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून होणाऱ्या टीकेला आदिती तटकरे यांनी यावेळी उत्तर दिले. घराणेशाही हा विषय इथे असू शकत नाही. कारण आम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. मायबाप जनतेने आम्हाला इथे बसवले आहे आणि आमच्या नेतृत्वाने आम्हाला जबाबदारी दिली आहे. त्या-त्या जिल्ह्याच्या मंत्र्यांना वाटत असते की त्यांनी पालकमंत्री व्हावे. अशी इच्छा व्यक्त करण्यात काहीही वावगे नाही. पण ती इच्छा व्यक्त करताना आपण ती कशा प्रकारे करतो याला महत्त्व आहे, असा टोला त्यांनी पालकमंत्रिपदासाठी रायगडमध्ये आंदोलन करणाऱ्या शिवसेना शिंदे सेनेला लगावला आहे.
निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून यावे यासाठी आम्ही सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले. त्यामुळे मुख्यमंत्री राज्याचे प्रतिनिधीत्व करत असताना कुठलाही मुद्यावर वातावरण खराब करणे योग्य नाही. पालकमंत्रिपदाबाबत महायुतीतील नेतृत्वाकडून जो निर्णय घेतला जाईल, त्याचे पालन करणे गरजेचे आहे, असेही तटकरे म्हणाल्या.