कोविडने माणसांचा दृष्टिकोन, विचारसरणी सगळेच बदलून टाकले. आजच्या तरुण पिढीला आनंदात आणि स्वत:च्या मनाप्रमाणे जगायचे आहे. त्यांना कथित रॅट रेसमध्ये रस नाही. अनेकजण करिअरचा ट्रॅकच बदलण्याच्या विचारात आहेत. म्हणून जगभरातच राजीनामा सत्र सुरू झाले आहे. त्यातच वीकेंड दोन नाही तर तीन दिवसांचा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोविडनंतरच्या बदलत्या विचारसरणीचा हा वेध.
गेले जवळपास अठरा महिने देशात लॉकडाऊनची स्थिती राहिली. गेल्या काही दिवसांमध्ये वातावरण निवळले असले तरी शक्य तिथे कर्मचारी आणि कंपन्याही ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यसंस्कृतीला पहिली पसंती देत आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ शक्य नसल्यास प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन जोमाने काम करण्यास सुरुवात झाली आहे. वर्क फ्रॉम होम असो अथवा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन काम करणे असो, या दोन्ही बाबतीत कर्मचार्यांना विचारले तर ते आठवड्याच्या शेवटी वीकेंडची आतुरतेने वाट पाहत असतात.
शनिवार-रविवारची सुट्टी ही पाच दिवसांच्या वर्क फ्रॉम होम किंवा प्रत्यक्ष जाऊन केलेले काम या ढोर मेहनतीवरचा उतारा मानला जातो. हे जगभर सुरू आहे. आम्ही वीकेंडची वाट पाहत नाही, असे म्हणणारी मंडळी खोटे बोलतात.
तसे पाहिले तर शनिवार-रविवार हे देखील सोमवार ते शुक्रवारसारखे सामान्य वार. पण एकदा का त्याला वीकेंड हे लेबल लागले की सगळेच बदलते. नोकरदार माणसांसाठी वीकेंड म्हणजे एक छोट्या स्वरुपाचा अत्यावश्यक, कौटुंबिक सणच. पण त्या वीकेंडच्या पुढे-मागे जोडून सुट्ट्या आल्या तर ती पर्वणीच असते.
अलीकडच्या काळात वीकेंड दोनच दिवसांचा का? तीन दिवसांचा का नको? असा सवाल पुढे येऊ लागला आहे. म्हणजे सोमवार ते शुक्रवार आठ ते नऊ तास मान मोडून काम केल्यानंतर दोन दिवसांचा वीकेंड ही प्रथा झाली. ती सध्या प्रचलित आहे. पण अनेक ठिकाणी आठ तासांऐवजी बारा ते चौदा तास दररोज काम करतो, पण दोनऐवजी तीन दिवसांचा वीकेंड द्या, अशी मागणी लोकप्रिय होत आहे. तसेच शक्य आहे तिथे कंपनी व्यवस्थापन हे मान्य देखील करत आहे. नव्वदीच्या दशकात मला एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीचा प्रमुख म्हणून वारंवार अमेरिकेला जावे लागे.
तिथे तेव्हाही शुक्रवारच्या लंच ब्रेकनंतर वीकेंड मूडला सुरुवात व्हायची आणि त्याला जोडून सुट्टी आली असेल तर एक दिवस तयारीचा, एक दिवस पार्टी करण्याचा, एक दिवस त्या हँगओव्हरमधून बाहेर पडण्याचा आणि एक दिवस ‘चिल’ करण्याचा असे गंमतीने म्हटले जायचे. प्रत्यक्षात वीकेंड आणि त्याला जोडून आलेली सुट्टी याकडे मंडळी डोळे लावून बसलेली असायची.
कोविडनंतर आपले काम आणि आपले वैयक्तिक जीवन याकडे बघायचा जगभरातल्या नोकरदारांचा दृष्टिकोन बदललेला आढळतो. म्हणजे वर्ष सुरू व्हायच्या आधी शनिवार-रविवारला जोडून असलेल्या सुट्ट्या कोणत्या कोणत्या महिन्यात आहेत, याचे एसएमएस प्रचंड मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड होतात. कामावर जाऊच नये, असे खूप मोठ्या संख्येने का बरे वाटू लागले आहे नोकरदारांना?
लॉकडाऊनची प्रदीर्घ सुट्टी उपभोगल्यानंतरही ही भावना बळावत आहे याचे कारण या महाभयानक अनुभवातून गेल्यानंतर ‘बदललेला जीवन दृष्टिकोन’ या विषयावर सध्या जगातल्या अनेक संस्था संशोधनात मग्न आहेत. अमेरिकेत तर कामावर जाऊ नये असे वाटणे हा एक फार मोठा कॉर्पोरेट धोका समोर आला आहे.
नोकरदार आपल्या कामावर, कंपनीवर, कार्यसंस्कृतीवर नाखूश आहेत. त्यामुळे काल-परवापर्यंत ते वीकेंड अथवा त्याला जोडून आलेल्या सुट्ट्या शोधायचे. पण आता करिअरमधून ब्रेक घेण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत. काहींना आपल्या करिअरचा ट्रॅक बदलायचा आहे.
कोविडनंतर जीवनविषयक दृष्टी बदलल्यामुळे आहे त्या जॉबमध्ये एक प्रकारची निराशा, साचलेपण, स्थितीशिलता, बोअरडम याचा अनुभव घेतला जात आहे. करोनानंतर बहुतांश नोकरदार दुसरी नोकरी किंवा स्वयंरोजगाराची संधी मोठ्या प्रमाणावर शोधत आहेत. कोणा यशस्वी डॉक्टरला ऑपरेशन थिएटरऐवजी ऑपेरा थिएटरमध्ये जाऊन व्हायोलिन हाती घेऊन संगीत वाजवायचे आहे तर गणिताच्या प्राध्यापकाला हातात खडूऐवजी कुदळ घेऊन शेती करायची आहे. कारकून म्हणून खर्डेघाशी करणार्या तरुणाला आता बॉडीबिल्डिंगमध्ये भाग घ्यायचा आहे. वर्गात शिकवणार्या शिक्षिकेला कथ्थक किंवा भरतनाट्यममध्ये करिअर करायचे आहे.
या सर्व भावना करोनानंतर अधिक ठळकपणे उमटत आहेत आणि त्यातून ज्यांना शक्य आहे ते आपल्या सध्याच्या नोकरीचा राजीनामा देत आहेत. अमेरिकेत तर एखादी टोळधाड यावी अथवा साथ पसरावी तसेच झाले आहे.
एकट्या अमेरिकेत एका महिन्यात 43 लाख लोकांनी आपल्या नोकर्यांचे राजीनामे दिले, असे एका सर्वेक्षण संशोधनात पुढे आले आहे. एकूण अमेरिकन कर्मचार्यांच्या तुलनेत हे प्रमाण तीन टक्के इतके मोठे आहे. काम करत असलेल्यांपैकी 50 टक्के लोक दुसर्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. पूर्वी मी एका मोठ्या कॉल सेंटरचा सी.ई.ओ. होतो. कॉल सेंटर क्षेत्रात एकूण कर्मचार्यांपैकी पाच ते दहा टक्के लोकांनी दर महिन्याला राजीनामा देणे हे सर्वसामान्य होते. या क्षेत्रात आलो तेव्हा पहिल्यांदा मला धक्काच बसला.
खूप त्रास झाला. लिफ्ट चालत नाही, ने-आण करणारी गाडी एसी नाही, ऑफिसमधले कारपेट आवडले नाही अशा फुटकळ कारणांवरून राजीनामे देणारे असंख्य तरुण-तरुणी मी पाहिले आहेत. कँटिनमधले जेवण आवडले नाही म्हणून राजीनामा दिला असे सांगणार्यांची संख्या तर फारच मोठी! ज्यांचे पगार वार्षिक चार ते आठ लाख रुपयांमध्ये आहेत, त्यात राजीनामा देणार्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. एक तर वय ही त्यांच्या जमेची बाजू असते आणि पर्यायांची उपलब्धता, फारशा जबाबदार्या नसणे, एक बेफिकीर स्वच्छंद मनोवृत्ती यामागे असावी. सध्या मात्र समोर येणार्या राजीनामा सत्रामागची मानसिकता आणि कारणे इतकी फिल्मी नाहीत.
कोविडच्या दाहक अनुभवानंतर आयुष्याविषयीची क्षणभंगुरतेची भावना वाढीला लागली असावी. ‘रॅट रेस’मध्ये पळण्यापेक्षा ‘टेक इट इझी’ अथवा ‘बी कूल’ ही भावना बळावते आहे. त्यामुळे आयुष्य ढकलण्यापेक्षा मनापासून आवडते तेच उपजीविका म्हणून स्वीकारण्याकडे कल वाढला आहे.
एकंदरीत आता ‘लिव्ह लाईफ किंगसाईज’ किंवा ‘क्वीन साईज’ हा मंत्र प्रत्येकाला जगायचा आहे. कोविडने आम्हाला मन मारून जगायचे नाही, मनाविरुद्ध जगायचे नाही तर मनासारखे जगायचे हा मंत्र दिला आहे. म्हणूनच लाँग वीकेंड अथवा नोकरी बदलणे, रोजगाराचे क्षेत्रच बदलणे हा कल जगभर वाढीला लागला आहे. 25 वर्षांच्या कॉर्पोरेट अनुभवानंतर माझे असे ठाम मत झाले आहे की, लोक कंपन्या सोडत नाहीत तर कंपनीतल्या माणसांना कंटाळून कंपन्या बदलतात. त्यामागे वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, परस्परसंबंध, विकासाच्या संधी, कथित असुरक्षितता अशी अनेक कारणे आहेत.
पूर्वी ढोर मेहनत करून लोक ‘बर्न आऊट’ला सामोरे जायचे. आता स्वत:ला गाडून घेऊ आणि पन्नाशीनंतर मनासारखे जगू, अशी वृत्ती असायची. कोविडनंतर मात्र या बर्न आऊटला लोक तयार नाहीत. त्यांना मनासारखे करून उपजीविका कमवायची आहे आणि ती उद्या नाही तर आजच हवी आहे! मला जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे कोविड होऊन गेलेल्या अनेकांना बरे झाल्यावर देखील नोकरी बदलायची आहे. असे वाटणार्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. कदाचित कोविडमुळे झालेली शारीरिक, मानसिक, भावनिक क्षती कारणीभूत असावी.
आयुष्य एकदाच मिळते. मग ते मनाविरुद्ध का जगा? उद्याचे कोणी पाहिले आहे? मग जीवन जगायचे ते आजच आणि तेदेखील आनंदात…. ही आजची मानसिकता आहे आणि राजीनामा सत्रामागचे खरे कारण देखील. आयुष्य ही एक रॅट रेस आहे आणि ती तुम्हाला जिंकायची आहे. कोणतीही किंमत देऊन, पडतील ते कष्ट करून ती जिंकायची भावना आता कमी झाली आहे.
कोविडनंतर एक निश्चित जाणवले आहे. तुम्ही ‘रॅट रेस’ जिंकलीत आणि अगदी पहिले आलात तरी देखील तुम्ही एक ‘रॅट’च असता. मग असे मोठा रॅट होणे कसे आवडणार? कालपर्यंत हे कळत नव्हते, जाणवत नव्हते. आता ते जाणवत आहे. आयुष्य असे ‘रॅट रेस’मध्ये धावण्यात खर्च करण्यात नव्या पिढीला रस नाही. त्यांना त्यांच्या स्वप्नांची पूर्ती स्वत:च्या तब्बेतीने करायची आहे.