मुंबई । Mumbai
देशातील ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यानंतर आज टाटा समुहाच्या नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. टाटा समुहाचे नवे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबईमध्ये टाटा समुहाच्या झालेल्या बैठकीमध्ये हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा तर आईचं नाव सोनी टाटा होतं. १९४० च्या दशकात नवल टाटा आणि सोनी टाटा यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर नवल टाटा यांनी सिमोन यांच्याशी लग्न केलं. या दोघांच्या मुलाचं नाव नोएल टाटा आहे. नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत.
दोन्ही ट्रस्टची त्यांच्याकडे ६६ टक्के भागिदारी आहे. टाटा सन्स ही टाटा ग्रुपची पेरेंट कंपनी आहे. नोएल टाटा हे गेल्या ४० वर्षांपासून टाटा ग्रुपचे सदस्य आहेत. टाटा इंटरनॅशनल, वोल्टास, टाटा इनवेस्टमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन आहेत. टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे व्हाईस चेअरमन आहेत. नोएल टाटांच्या नेतृत्त्वात ट्रेंटचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला.