-
रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचा उपक्रम
-
प्रथमच मोफत यांत्रिकी कृत्रिम हात प्रत्यारोपण शिबीर
नाशिक : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ आणि रोटरी क्लब ऑफ इंदोर अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये पहिल्यांदाच मोफत यांत्रिकी कृत्रिम हात प्रत्यारोपण शिबिर संपन्न झाले.
सोबतच यानिमित्ताने उत्तर महाराष्ट्रात प्रथमच कायम स्वरूपी अशा यांत्रिकी कृत्रिम हात प्रत्यारोपण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे कुठल्याही गरजू व्यक्तीना शिबिराच्या आयोजनाची वाट पाहावी लागणार नाही. सदरचा कक्ष जी शॉपी, चांडक सर्कल, नाशिक येथे उभारण्यात आला आहे.
अनेकादा जन्मापासून, दुर्घटनेने, काही आजारपणामुळे किंवा इलेक्ट्रीकच्या शॉकमुळे लोक हात गमवतात. अशा लोकांसाठी यांत्रिकी कृत्रिम हाताचे प्रत्यारोपण वरदान ठरते. समाजाची हीच गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थने या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन नाशिक महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, महानगरपालिका लवकरच दिव्यांगांसाठी शहर परिसरात सर्वे पूर्ण करत असून एक वेगळे अॅप तयार करणार आहे. त्यात संकलित माहितीच्या आधारे गरजूंना रोटरी क्लब ऑफ नॉर्थच्या मदतीने कृत्रिम हात प्रत्यारोपण केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी शिबिर आणि कृतीम हाताविषयी बोलतांना रोटरी क्लब ऑफ नॉर्थचे अध्यक्ष महेश गाडेकर यांनी संगितले की, कृत्रिम हात हा अमेरिकेतील एलन मिडोज प्रॉस्थेटिक अॅड हैड फौंडेशन तर्फे तयार आणि वितरीत केला जातो. या हाताची किंमत ३०० डॉलर अर्थात त्याची भारतीय बाजारपेठेत २१ हजार रुपये आहे.
मात्र रोटरी क्लब तर्फे सामाजिक उपक्रम आणि दायित्व म्हणून सदरचा हात पूर्णपणे मोफत देण्यात येतो. नाशिकमध्ये पार पडलेल्या या पहिल्या शिबिरात एकूण ६० नोंदी झाल्या होत्या. त्यामध्ये ४५ दिव्यांगाना हात बसवण्यात आले आहेत. तर १२ दिव्यांगाना हातांना लावण्यासाठी एक्सटेन्शन हाताची गरज असल्याचे दिसून आले.
त्यामुळे त्यांना येत्या जानेवारी महिन्यात इंदौर येथे होणाऱ्या शिबिरात हे हात जोडण्यात येणार आहे. नाशिक शहर उत्तर महाराष्ट्रातील मध्यवर्ती जिल्हा असल्याने उत्तर महारष्ट्रातील पहिले असे पूर्ण वेळ असे कृत्रिम हात प्रत्यारोपण सेंटर सुरु करत आहोत. या ठिकाणी मोफत स्वरूपात यांत्रिकी कृत्रिम हात प्रत्यारोपण केले जाणार आहे.
या हातामुळे संबंधित व्यक्ती सायकल चालविणे, हलके वजन उचलणे यासह सर्व कामे अगदी सहज करू शकतात. हा हात ब्रास, स्टेनलेस स्टील व उच्च प्रतीच्या प्लास्टीक मटेरियलपासून तयार केलेला आहे. त्यावर पाणी, धूळ व उष्णता यांचा परिणाम होत नाही. हा हात अत्यंत मजबूत असून, त्याचे वजन फक्त ४०० ग्रॅम आहे.
शिबिरामध्ये खास इंदौर येथून आलेले रोटरी क्लब ऑफ इंदोर अपटाऊनचे तरुण मिश्रा यांनी लाभार्थ्याकडून हात कसा वापरायचे यांचे प्रात्यक्षिकही करून घेतले. त्याच्याकडून कप उचलणे, काकडी चिरणे, ब्रश करणे आदी गोष्टी करून घेतल्या. या शिबिराला कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (cho) बिटको हॉस्पिटलचे विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला रोटे डॉ. आवेश पलोड यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रोजेक्ट डायरेक्टर राजेंद्र धारांकर, सेक्रेटरी उमेश राठोड, नाना शेवाळे, प्रशांत सारडा, मनीष ओबेरॉय, मंगेश जाधव, खजिनदार गीता पिंगळे, आश्विनी जोशी, अर्चना मेतकर, ओमकार महाले, आशिष चांडक, अशोक सोनवणे, मेहुल देसाई, किरण संगोरे, सुशांत जाधव, रुपेश झटकरे, जिमी जोशी, विवेक आंबेकर यांच्यासह रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे सदस्य उपस्थित होते.
यांत्रिकी कृत्रिम हाताची अशी आहेत वैशिष्ट्ये
– विना ऑपरेशन काढायला – लावायला सोपा.
– सुंदर, मजबूत आणि कमी वजनाचा.
– लिहिणे , वजन उचलणे आदी कामे सहज करता येतात.