मुंबई :
प्रसिद्ध दिग्दर्शित सुमित्रा भावे यांचे निधन झाले आहे. त्या 78 वर्षांच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. सोमवारी सकाळी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात त्यांनी या जगचा निरोप घेतला. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सिनेसृष्टीला मोठे नुकसान झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या एक समाज अभ्यासक देखील होत्या.
भावे यांनी एकूण सुमारे 14 चित्रपट, 50 हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांची निर्मिती केली. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं होतं. सुमित्रा यांच्या ‘बाई’, ‘पाणी’ हे दोन लघुपटं चांगलीचं गाजली. या लघुपटांना मिळालेल्या यशानंतर त्यांनी ‘दोघी’ हा चित्रपट 1995 साली तयार केला. ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, संहिता, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुमित्रा यांनी उत्तम रित्या पार पाडली.
त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे. सुमित्रा यांच्या कित्येक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. सोनाली कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर अशा अनेक कलाकारांना सुमित्रा भावे यांच्याकडे सिनेमाचे धडे गिरवता आले.