Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारग्रामसेवकांच्या नियमबाहय बदल्या केल्याप्रकरणी तळोदा बीडीओंना नोटीस

ग्रामसेवकांच्या नियमबाहय बदल्या केल्याप्रकरणी तळोदा बीडीओंना नोटीस

सोमावल, ता तळोदा – Taloda – वार्ताहर :

अधिकार नसतांनाही ग्रामसेवकांच्या नियमबाह्य बदल्या केल्याप्रकरणी तळोदा येथील पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सावित्री खर्डे यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

- Advertisement -

याबाबत तीन दिवसात खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नोटीसीमुळे पंचायत समिती वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी गटविकास अधिकारी श्रीमती एस.बी.खर्डे यांना दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, तळोदा तालुका अंतर्गत ग्रामसेवकाच्या नियम बाहय बदल्या केल्याबाबत आपले सरकार पोर्टलवर तक्रार प्राप्त झालेली आहे.

त्याअनुषंगाने मागविण्यात आलेल्या अहवालाचे अवलोकन केले असता तक्रारीच्या अनुषंगाने कागदपत्र सादर न करता सर्वसाधारण बदल्याची माहिती या कार्यालयाकडे पाठवुन कार्यालयाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्वसाधारण बदल्यानंतर किती ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत असा अहवाल मागविण्यात आला होता.

त्याअनुषंगाने आपल्याकडू प्राप्त अहवालाचे अवलोकन केले असता पदाधिकार्‍यांच्या लेखी तक्रारीमुळे एकुण 5 बदल्या केल्या आहेत. बदल्या करण्याचा अधिकार नसताना शासनाचे बदली संदर्भातील शासन निर्णयाचे उल्लंघन करुन नियम बाहय बदल्या केलेल्या आहेत.

वास्तविक पाहता गट स्तरावर ग्रामसेवक यांच्याबद्दल पदाधिकार्‍यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने सखोल चौकशी करुन ते दोषी आढळून आल्यास त्यांची इतर ठिकाणी बदली करणे कामी त्यांचा वस्तुनिष्ठ एकत्रीत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे पाठविणे क्रमप्राप्त होते.

त्यांची खात्री झाल्यानंतर विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडेस मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावयाचे असतात. असे असतांनाही आपल्या गट स्तरावर अधिकार नसतांना चुकीच्या बदल्या केल्याचे निर्दशनास आले आहे.

सदर बाब गंभीर स्वरुपाची व कर्तव्यात कसूर करणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी (वर्तणूक) नियम 1979 कलम 3चा भंग केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे आपणाविरुध्द शिस्तभंगाचा प्रस्ताव शासनास का सादर करण्यात येऊ नये? याबाबत तीन दिवसाच्या लेखी खुलासा करावा.

वेळीच खुलासा प्राप्त न झाल्यास तुमचे काहीही म्हणणे नाही असे समजून शिस्तभंग विषयक कार्यवाहीचा प्रस्ताव शासनास सादर केला जाईल, असा इशारा श्री.गावडे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या