नाशिक | Nashik
लेखक संजय सोनवणी यांची विसाव्या शतकातील अखेरच्या दशकात भारताने काय काय अनुभवले याचे यथार्थ दर्शन घडविणारी ‘सव्यसाची’ ही बहुचर्चीत सामाजिक कादंबरी ‘स्टोरीटेल मराठी’ने नव्या ऑडिओबुकमध्ये खास साहित्यरसिक श्रोत्यांसाठी आणली आहे.
त्या काळातल्या वास्तवावर आधारित कल्पनांचा सुरेख अनुभव या कादंबरीमध्ये आला असून माफिया टोळ्यांमुळे निर्माण झालेल्या या काळातील वर्तमानातल्या सामाजिक जीवनाचे चित्र नाट्यात्मक व गतिमानतेने अचूक साधले गेल्याने ‘स्टोरीटेल’च्या या ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुख यांच्या स्पष्ट आवाजात ऐकताना श्रोते तल्लीन होतात.
‘सव्यासाची’ या कादंबरीत विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकाने नेमके काय काय भोगले याची गाथा कथन करण्यात आली आहे. नवी अर्थव्यवस्था आणि त्या अनुषंगाने ढवळली गेलेली जुनी व्यवस्था आणि मूल्ये राजकारणाचा झालेला अध:पात आणि गुन्हेगारीकरण, धार्मिक तेढ वाढवत त्याचा धंदा करणारे दलाल आणि यासोबत असहाय्यपणे या नव्या वातावरणाशी जुळवत, नवी स्वप्ने पहात फरफटत जाणारा संभ्रमित समाज याचे विराट दर्शन या महाकाय कादंबरीत घडते.
सर्वव्यापकता एवढेच काही या कादंबरीचे वैशिष्ट्ये नाही. या परिवर्तनाच्या काळात सामील झालेल्या सर्वच भल्याबुऱ्या पात्रांचे, त्यांच्या जीवनाचे आणि घटनांचे चित्रण अत्यंत सहृदयतेने लेखकाने केल्याने ती स्टोरीटेलवर ऑडिओबुकमध्ये ऐकताना साहित्यरसिक श्रोते दंग होतात.
एकाच प्रवाहात कोमलता, कारुण्य आणि नृशंसता यांचा मिलाफ साधताना सर्वच घटनांची सर्वांगीण मिमांसाही केली असल्याने तटस्थ सहृदयतेचेही दर्शन घडविण्याची किमया या कादंबरीत लेखकाने साधली गेली आहे. ‘सव्यसाची’च्या रुपात विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकातील वर्तमानाचा आरसा दाखिविला गेला आहे.