Thursday, May 23, 2024
Homeमुख्य बातम्याखबरदार! वाहतूक नियम भंग कराल तर...; आता शहरावर 'इतक्या' सीसीटीव्हींची नजर

खबरदार! वाहतूक नियम भंग कराल तर…; आता शहरावर ‘इतक्या’ सीसीटीव्हींची नजर

नाशिक | फारुक पठाण | Nashik

नाशिक शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामानाने लहान-मोठ्या वाहनांची संख्या देखील प्रंचड वाढली आहे. अशा वेळेला वाहतुकीला शिस्त लावण्याचे मोठे आव्हान शहर वाहतूक पोलीस दलासमोर होते. त्यावर उपाय म्हणून आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील तब्बल ६३५ ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात येऊन त्याचे कंट्रोल थेट पोलीस आयुक्तालयातून करण्यात येत आहे.

- Advertisement -

एकूण ८०० सीसीटीव्ही कॅमेरे शहरातील विविध भागात लावण्यात येणार असून आतापर्यंत ६३५ कॅमेरे लावण्याचे काम पूर्ण झाले असून त्यातील ६० कॅमेरे सुरू झाले आहे. शहर पोलीस दलाच्या वतीने त्याचे नियोजन करण्यात येत असून कोणी नियम भंग केल्यास त्वरीत थेट कंट्रोलरुम मधून त्याठिकाणी लावण्यात आलेल्या भोंग्यातून शिस्त पाडण्याची सूचना करण्यात येत आहे. दरम्यान यंत्रणा पूर्णपणे सुरू झाल्यावर इ-चलनव्दारे दंड आकारण्यात येणार आहे. नाशिकमध्ये २०२७ ला होणार्‍या कुंभमेळ्याच्या दृष्टीने ही यंत्रणा महत्वाची भूमिका बजावणार आहे.

नियम तोडणार्‍या वाहनाच्या नंबरच्या आधारे रिमोट ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे संबंधित चालकांना ई-चलन दिले जाणार आहे, मात्र ती यंत्रणा अद्याप सुरू झालेली नाही. ती सुरू झाल्यावर ऑनलाईन दंड आकारणी सुरू केली जाणार आहे. सध्या ज्या ठिकाणी यंत्रणा सुरू झाली आहे. तेथे पोलीस आयुक्तालयातील कंट्रोल रूम मधून नाशिककरांवर वॉच ठेवला जात आहे.

शहरातील विविध भागातील ६० जागांवर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत, त्याचे फुटेज थेट कंट्रोल रूममध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे थेट सिग्नलवर बेशिस्तपणा करणार्‍यांना सूचना करण्यात येत आहे. ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून थेट सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनधारकांना सूचना मिळत आहे. याबाबतची चाचणी देखील घेण्यात आली असून यात पोलीस संबंधित वाहनाचा नंबर पुकारत चालकाला नियम पाळण्याचा सल्ला देत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिसांकडे कंट्रोल

शहरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे दोन कंट्रोल रुम असून मुख्य कंट्रोल रुम पोलीस आयुक्तालयात उभारण्यात आला आहे. तर स्मार्ट सिटीकडे देखील एक कंट्रोल रुम राहणार आहे. पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये ६ बाय ४ फुटाची ‘एलसीडी वॉल’ लावण्यात आली असून १६ डबल पॅनलचे मॉनिटर, सिग्नलच्या ‘सीसीटीव्ही’चे चित्रीकरण, ‘कमांड रूम’ व्हॉइस मोड, झेब्रा क्रॉसिंग, यू-टर्न घेणार्‍यांवर ‘ऑटोमॅटिक ई-चलान’ अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

या सीसीटीव्ही यंत्रणेत तीन प्रकारच्या सिस्टम राहणार आहे. यामध्ये पहिले तर नियम भंग करणार्‍या वाहनाचा क्रमांक कॅच होणार आहे. त्याचप्रमाणे सिग्नल तोडणार्‍यांवर करडी नजर राहणार आहे, तर गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष सर्वलान्स यंत्रणा राहणार आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या