आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा! मराठी नववर्षाचा पहिला दिवस. हा सण मराठी मुलखात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तो का, याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. मर्यादापुरुषोत्तम प्रभुरामचंद्रांनी दानवांचा आणि असुरी शक्तींचा नाश केला. चौदा वर्षांचा वनवास संपवून ते सीतामातेसह याच दिवशी अयोध्येला परत आले. दारावर गुढ्या उभारुन लोकांनी त्यांचे स्वागत केले ही त्यापैकी एक कथा. निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुढीची प्रतिकात्मक पुजा करतात. शेतकरी नव धान्याची पुजा करतात. या महिन्यानंतर नव्याने पेरणीसाठी शेतीच्या प्राथमिक कामांचे नियोजन करतात असेही सांगितले जाते. याच दिवशी शालीवाहन शकाचा प्रारंभ झाला आणि तेव्हापासुन मराठी कालगणनेला सुुरुवात झाली. असा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त. लोक या दिवशी शुभ कामांना सुरुवात करतात. आयुर्वेदानुसार हा ऋतुसंधीचा काळ मानला जातो. निसर्गात आणि आरोग्यात होणारे बदल सुसह्य व्हावेत यासाठी गुढीपाडव्याला कडुनिंब, हिंग, गूळ, धने, जिरे, ओवा एकत्र करुन तो प्रसाद म्हणुन सेवन करण्याची परंपरा घरोघरी पाळली जाते. असा हा बहुविध संदर्भांनी नटलेला दिवस साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला जातो. घरखरेदी, वाहनखरेदी, सोने खरेदी करण्याकडेही लोकांचा कल असतो. तथापि हवामानात प्रचंड बदल होत आहेत. एकाच ऋतूत तीन ऋतु लोकांच्या अनुभवास येतात. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर, शेतीवर आणि पर्यार्याने अर्थचक्रावर होतो. त्यामुळे गुढीपाडव्याचे अनेक संदर्भ कदाचित प्रतिकात्मक ठरत आहेत. पण सण साजरा करण्याचा लोकांचा उत्साह मात्र जराही उणावलेला नाही. फक्त गुढीपाडवाच नव्हे तर सगळेच सण लोक प्रचंड उत्साहात साजरे करतात. शहरांमध्ये नववर्ष स्वागत यात्रा काढतात. सांस्कृतिक महोत्सव भरवतात. महारांगोळी काढतात. यानिमित्ताने लोक एकत्र येतात. सुखदु:खाची देवाणघेवाण करतात. गळाभेटी घेतात. हीच सामाजिक समरसता समाजात खोलवर रुजण्याची आवश्यकता आहे. छोट्या मोठ्या कारणांवरुन सामाजिक वातावरण गढुळ होते. विघातक शक्ती जातपात आणि धर्माच्या आधारे सामाजिक दुफळी माजवतात. समाजाला विघटनाच्या उंबरठ्यावर आणून ठेवणे हाच या विघातक शक्तींचा मुळ उद्देश असतो. त्यामुळे सामाजिक सहिष्णूता धोक्यात येते. सामाजिक बांधिलकीचा विसर लोकांना पडतो. सामाजिक ओळख सांगण्यासाठी लोक कचरतात. गुढीपाडव्यासारखे सण सामाजिक वातावरण चैतन्यमय करतात. वातावरणात उत्साह आणतात. गुढीपाडव्याचा संदेश देताना कवयित्री बहिणाबाई म्हणतात,
गुढीपाडव्याचा सन, आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं, सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी, आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी, लोभ वाढवा वाढवा
यातील मर्म लोक लक्षात घेतील का? याच काळात सामाजिक भान राखायला हवे. करोनाची साथ पुन्हा डोके वर काढू शकते असा इशारा सरकार आणि वैद्यकीय तज्ञ देत आहेत. करोना संसर्गाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सामाजिक निर्बंधांची त्रिसुत्री लोक पुन्हा एकदा अंमलात आणतील आणि करोना संसर्गापासून बचाव करतील अशी आशा करावी का?