छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar
वाढत्या कचऱ्याच्या समस्येने प्रत्येक शहरातील प्रशासकीय यंत्रणा हैराण असताना कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या निर्णयाने काहीसा का होईना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या (Municipality) वतीने कचऱ्यापासून पेव्हर ब्लॉकची निर्मिती करण्याचे निश्चित केले आहे.
शहरातून निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे बांधकाम व्यवसायासाठी उपयुक्त कच आणि रस्ता बांधकामासाठी उपयोगी पेव्हर ब्लॉक तयार करण्यात येणार आहे. प्रक्रिया करणार्या कंपनीने तसा प्रस्ताव महापालिकेला दिला असून महापालिका त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर रोज बांधकाम वेस्ट निघते. मात्र यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे कचरा प्रक्रिया केंद्रात त्याचे मोठे डोंगर तयार झाले आहे. याशिवाय मैदानावरही त्याचे ढिगारे तयार झाले आहेत. या बांधकाम वेस्टवर देखील महापालिका आता प्रक्रिया करणार असून, त्याचा पुन्हा वापर करणार आहे. राज्यात काही शहरात हा प्रकल्प सुरू आहे. या शहरात हे काम करणाऱ्या एजन्सीने छत्रपती संभाजीनगरात देखील काम करण्याचा प्रस्ताव दिला असून, लवकरच ही कंपनी प्रेझेंटेशन देणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.
शहरात बांधकाम वेस्टवर प्रक्रिया करण्यासाठी काहीच उपाययोजना नाही. आता यावर प्रक्रिया करून बांधकामासाठी लागणारी कच, पेव्हर ब्लॉक तयार करण्यात येणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर या ब्लॉकची गरज असते. इतर शहरात याच प्रक्रिया केंद्रातून तयार झालेले पेव्हर ब्लॉक वापरले जातात. आपल्या शहरात देखील हाच पॅटर्न राबविण्याची इच्छा असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. या शिवाय मांसाहारासाठी कत्तलखान्यातून जो कचरा निघतो त्यावर देखील वेगळी प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे प्रशासकांनी सांगितले. यासाठी विशेष निधीची तरतूद देखील करण्यात येणार आहे.